भाजपच्या नवनिर्वाचित झेडपींना मार्गदर्शन
आगामी निवडणुकांसंदर्भात कार्यक्रमांची आखणी
पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपने घवघवीत यश प्राप्त केल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपने विविध राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत संघटनात्मक बैठक घेऊन मंत्री, आमदार, पदाधिकारी यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ‘सागर मंथन’ सारख्या कार्यक्रमांच्या आयोजनासह अनेक निर्णय घेण्यात आले. आगामी निवडणुकीच्यादृष्टीने रणनीती म्हणून मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा पंचायत निवडणुकीनंतर आता लवकरच काही पालिका आणि मनपाचीही निवडणूक होणार आहे. त्याशिवाय येत्या तीन महिन्यात फोंडा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. त्यानंतर 2027 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आतापासूनच तयारीला लागला आहे. त्याचाच भाग म्हणून या मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन प्रारंभ झाले आहे.
दरम्यान, या बैठकीतनंतर राष्ट्रीय संघटन महामंत्री बी. एल. संतोष हे आज दि. 24 रोजी दुपारी होणाऱ्या ‘सागर मंथन’ या परिसंवादात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर पुढील आठवडाभर राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. या बैठकांच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याची भाजपची रणनीती आहे. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी नवनिर्वाचित जिल्हा पंचायत सदस्यांना एकत्र आणणे, त्यांची एकमेकांशी ओळख करून देणे आणि त्यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनाही मार्गदर्शन करणे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, असे सांगितले.
अटल बिहारी वाजपेयी यांचे शताब्दी
दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे शताब्दी वर्ष साजरे करत आहोत. त्यानिमित्त स्मृतीसंमेलन आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर दि. 26 रोजी वीर बालदिवस आयोजित करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. हे सर्व कार्यक्रम दि. 25 ते 31 डिसेंबर या दरम्यान राज्यभरात विविध मतदारसंघांमध्ये होतील, अशी माहिती नाईक यांनी दिली.
7 जानेवारीपर्यंत झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड
येत्या दि. 7 जानेवारीपर्यंत दोन्ही जिल्हा पंचायतींचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडण्यात येतील, असे सांगताना दोन्ही जिल्हा पंचायती भाजपकडेच आल्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडण्यासंबंधी आम्ही निश्चिंत आहोत, असे, संबंधित प्रश्नावर बोलताना दामू नाईक यांनी सांगितले.