For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चार महिने वेतन न मिळाल्याने अतिथी शिक्षक संकटात

10:00 AM Jan 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
चार महिने वेतन न मिळाल्याने अतिथी शिक्षक संकटात
Advertisement

वार्ताहर /नंदगड

Advertisement

खानापूर तालुक्यात काम करणाऱ्या अतिथी शिक्षकांना गेल्या चार महिन्यापासून वेतन (मानधन) देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक कुचंबणा होत आहे. बीईओ कार्यालयाला जाऊन यासंबंधी अतिथी शिक्षकांनी चौकशी केल्यानंतर  आपले वेतन (अलॉऊटमेंट) आले नसल्याचे उत्तर त्यांना मिळाले. त्यामुळे संतापलेल्या अतिथी शिक्षकांनी आमदार विठ्ठल हलगेकर यांना गाठून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. खानापूर तालुक्यातील अनेक अतिथी शिक्षक, खानापूरहून 25 ते 30 किलोमीटर आपल्या मोटारसायकलवरून येऊन-जाऊन उत्तमप्रकारे सेवा बजावतात. बरेच शिक्षक विवाहित असून त्यांच्या घरचे कुटुंब त्यांच्यावर अवलंबून आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पुढे कसा चालवावा हा भलामोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. आजच्या या महागाईत त्यांना खूप समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आज शाळेवर जाण्यासाठी गाडीमध्ये पेट्रोल घालण्यासाठीसुद्धा पैसे नाहीत. अतिथी शिक्षकांचे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या चार महिन्यांचे वेतन (मानधन) देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे पैसे नाहीत. आर्थिक परिस्थिती खूप बिकट झाली असल्याचेही अनेक अतिथी शिक्षकांनी आमदारांना सांगितले व आपल्या मागणीचे निवेदन त्यांच्याकडे सादर केले. निवेदन देताना अतिथी शिक्षक नागेंद्र पाटील, मोहन पाटील, वीणा कुंडेकर, मनीषा पाटील, वनश्री मेटकर, प्रतिभा अल्लोळकर, प्रिया पाटील आदींसह अनेक शिक्षक उपस्थित होते. अतिथी शिक्षकांना शासनाने प्रत्येक महिना संपल्याबरोबर त्या महिन्याचे वेतन द्यावे. अतिथी शिक्षकांना आजच्या महागाईचा विचार करून कमीत कमी तीस हजार वाढीव मानधन द्यावे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, गोवा यासारख्या राज्याप्रमाणे अतिथी शिक्षकांना नोकरीमध्ये कायम करून घ्यावे. शासकीय शिक्षकाप्रमाणे अतिथी शिक्षकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागण्या त्यांनी निवेदनात केल्या आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.