अतिथी प्राध्यापकांना स्वत:ची पात्रता सिद्ध करणे बंधनकारक
महाविद्यालय शिक्षण खात्याची सूचना; बोगस प्रमाणपत्रधारकांना बसणार चाप
बेंगळूर : सरकारी प्रथमश्रेणी महाविद्यालयांमध्ये सेवा बजावत असलेले अतिथी प्राध्यापक बोगस प्रमाणपत्रे दाखल करीत असल्याच्या तक्रारी महाविद्यालय शिक्षण खात्याकडे येत आहेत. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी प्राध्यापकांची सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे संबंधित विद्यापीठाकडून एकवेळ मिळवून सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही प्रमाणपत्रे खात्याच्या इएमआयएस सॉफ्टवेअरमध्ये संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी समाविष्ट करावीत, असे खात्याने स्पष्ट केले आहे.
उच्चशिक्षण संस्थांमध्ये अध्यापनाचे काम करणाऱ्यांना पदव्युत्तर पदवीबरोबरच एनईटी अथवा कर्नाटक राज्य पात्रता परीक्षा (के-सेट) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पीएच.डी. पदवी मिळविलेली असावी, असा युजीसाचा नियम आहे. वरीलप्रमाणे पात्रता असलेले उमेदवारच प्रथमश्रेणी महाविद्यालयांमध्ये नेमण्यात यावेत, अशी सूचना खात्याकडून करण्यात आली आहे. सध्या ही बाब न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे 2025-26 मधील सेमिस्टरसाठ़ी मागील वर्षी अतिथी प्राध्यापक म्हणून काम केलेल्यांनाच संधी देण्यात येणार आहे. हे करीत असताना काही अटी घालण्यात येत आहेत.
राज्यातील पदवी महाविद्यालयांमध्ये सेवा बजावत असलेल्या अतिथी प्राध्यापकांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांची पडताळणी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी करावी. शैक्षणिक प्रमाणपत्रांबरोबरच कल्याण कर्नाटक आरक्षण, सेवा प्रमाणपत्र यांसह अन्य प्रमाणपत्रांची पडताळणी करावी. पदव्युत्तर शिक्षणाचे गुणपत्रक, पदवीदान समारंभात मिळालेले प्रमाणपत्र, पीएच.डी.,एम. फील., के-सेट, एनईटी यासारख्या प्रमाणपत्रांची पड़ताळणी अतिथी प्राध्यापकांनी स्वत:च करून खात्री करून घ्यावी. यासाठी येणारा खर्च अतिथी प्राध्यापकांनी स्वत:च करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मागील वर्षांपासून महाविद्यालय शिक्षण खाते अतिथी प्राध्यापकांची महाविद्यालयांमध्ये नेमणूक करीत आहे. पदव्युत्तर पदवीमध्ये 55 टक्के गुण मिळविले तरी संबंधित उमेदवाराची महाविद्यालयात अतिथी प्राध्यापक म्हणून नेमणूक करण्यात येत होती. यापुढे युजीसीच्या अटी मान्य करूनच उमदेवारांना अतिथी प्राध्यापक म्हणून रुजू व्हावे लागणार आहे. शैक्षणिक वर्षात तेच प्राध्यापक अध्यापन करणार असल्यास पुन्हा प्रमाणपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही, असेही खात्याने स्पष्ट केले आहे.