For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव तालुक्यात गुढीपाडवा पारंपरिक पद्धतीने साजरा

09:58 AM Apr 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव तालुक्यात गुढीपाडवा पारंपरिक पद्धतीने साजरा
Advertisement

हिंदू नववर्षारंभानिमित्त मंदिरांमध्ये अभिषेक, पूजाअर्चा, भजन, प्रवचन, कीर्तन कार्यक्रम : सर्वत्र भक्तिमय वातावरण

Advertisement

वार्ताहर /किणये

बेळगाव तालुक्यात मंगळवारी गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अनेक गावातील मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम झाले. मंदिरांमध्ये अभिषेक, पूजाअर्चा करण्यात आली. मंदिरांमध्ये भजन, प्रवचन, कीर्तन असे आध्यात्मिक कार्यक्रम झाले. गुढीपाडव्यानिमित्त मंगळवारी सकाळी तालुक्याच्या विविध गावातील नागरिक लवकर उठले. नंतर घरच्या प्रवेशद्वारावरती उंचावर गुढी उभारण्यात आली. उंच बांबूच्या अथवा लाकडाच्या काठीला कडूलिंबाची डहाळी काठीच्या वरच्या टोकाला बांधण्यात आली. तसेच रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळण्यात आली. फुलांचा हार व तांब्याच्या धातूचे भांडे बसवुन अनेकांच्या घरासमोर गुढी उभारण्यात आल्या होत्या. या गुढीची विधिवत पुजा महिलांनी केली. अनेकांनी गुढी उभारताना नवीन संकल्प केले. आंबा, करवंद, चुरन व अन्य अशा पाच पुराण मेव्यांचा बऱ्याच ठिकाणी नैवेद्यही करण्यात आला होता. त्याचे वाटप करण्यात आले. बऱ्याच गावांमध्ये गुढीपाडव्यानिमित्त पुरणपोळीचा नैवेद्य करण्यात आला. गुढीपाडव्याच्या निमित्ताने शेतकरी आपल्या शेतात जाऊन नांगरण करून या शुभमुहूर्तावर शेतशिवारात पूजा केली. गावागावातील मंदिरांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच फुलांची सजावट करण्यात आली होती. त्या त्या गावातील परंपरेनुसार मंदिरांमध्ये पूजाअर्चा करण्यात आली. दिवसभर भजन व मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. काही गावांमध्ये तीर्थप्रसाद व काही ठिकाणी महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले. हिंदू नववर्षारंभाने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

Advertisement

वाहनांसह इलेक्ट्रॅानिक वस्तूंची खरेदी जोरात

साडेतीन मुहूर्तापैकी एक गुढीपाडव्याचा मुहूर्त मानला जातो. या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ग्रामीण भागातही दुचाकी, चारचाकी वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. मोबाईल, टीव्ही, फ्रिज आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदीही ग्रामीण भागातील नागरिकांनी शहरात जाऊन मोठ्या प्रमाणात केली. तसेच सोने-चांदीची खरेदी करतानाही नागरिक दिसत होते.गुढीपाडव्याच्या एकमेकांना भेटून शुभेच्छा देण्यात येत होत्या. व्हाट्सअप, फेसबुक आदी सोशल मीडियाद्वारे तरुणाईनी शुभेच्छा दिल्या. काही गावांमध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्याप्रयोग व जागर भजन असे कार्यक्रम रात्री झाले.

Advertisement
Tags :

.