For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापूरसह तालुक्यात गुढीपाडवा उत्साहात साजरा

09:53 AM Apr 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
खानापूरसह तालुक्यात गुढीपाडवा उत्साहात साजरा
Advertisement

पहाटेपासूनच घरोघरी आंब्यांची तोरणे बांधून, रांगोळी घालून परंपरेनुसार गुढी उभाऊन पूजन

Advertisement

खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यात गुढीपाडव्याचा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच मंदिरातून विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. तर पहाटेपासूनच घरोघरी आंब्याची तोरणे बांधून सडा, रांगोळी घालून परंपरेनुसार गुढी उभाऊन त्याचे पूजन करण्यात आले. गोडदोड पदार्थांची रेलचेल होती. तर मंदिरांतून सायंकाळी दर्शनासाठी लोकांनी गर्दी केली होती. गुढीपाडव्याच्या निमित्ताने ग्रामदेवता रवळनाथ मंदिर, सातेरी माउली मंदिर, चौराशी मंदिर, लक्ष्मी मंदिर, राम मंदिर, ज्ञानेश्वर मंदिर तसेच शहरातील इतर मंदिरांत पहाटेपासूनच अभिषेक, पूजा विधी करण्यात आल्या. तर घरोघरी महिलांनी पहाटेपासूनच दारात सडासमार्जन करून रांगोळ्या काढल्या होत्या. त्यानंतर घरोघरी गुढी उभारुन पूजन करण्यात आले. दुपारी गोड पदार्थांची घरोघरी रेलचेल होती. तर बाजारपेठेत सकाळपासूनच मोठ्याप्रमाणात गर्दी होती. फुलांच्या हार आणि मागणीला मोठी मागणी दिसून येत होती. आपल्या वाहनांचेही पूजन करण्यात आले.

गुढीपाडव्यानिमित्त खरेदीसाठी दुकानातून मोठ्याप्रमाणात गर्दी झाली होती. सोने, टी.व्ही, फॅन, फ्रीज, कपडे खरेदीसाठी लोकांची दुकानातून गर्दी दिसून येत होती. सायंकाळी ग्रामदेवता महालक्ष्मी मंदिर, सातेरी माउली, रवळनाथ मंदिरात दर्शनासाठी लोकांची गर्दी दिसून येत होती. तर गुढीपाडव्यानिमित्त रवळनाथ मंदिरात देवाला चांदीच्या मूर्तीचे पूजन करण्यात येते. यापूर्वी साडेतीन मुहूर्तावर सोन्याच्या मूर्तीचे पूजन करण्यात येते. मात्र अलीकडे नव्याने मूर्ती स्थापन केल्यानंतर सोन्याच्या मूर्तीचे पूजन बंद करण्यात आले आहे. पाडव्यानिमित्त दुपारी 3 वाजता ग्रामजोशी सिताकांत जोशी यांनी पंचांगाचे पूजन करून वाचन केले. आणि पुढील वर्षाच्या भविष्याचा आणि पर्जन्यमानाचा आढावा सादर केला. ग्रामीण भागातही गुढीपाडवा पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त घरोघरी गुढी उभारण्याबरोबरच रस्तेही रांगोळ्यांनी सजविण्यात आले होते. ग्रामीण भागातील अनेक मंदिरांत यानिमित्त अभिषेक, पूजा, अर्चा व इतर धार्मिक सोहळे झाले. एकूणच खानापूर शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा झाला.

Advertisement

राम मंदिरात भागवत सप्ताहाचे आयोजन

गुढीपाडव्यानिमित्त येथील ऐतिहासिक राम मंदिरात मंगळवार 9 एप्रिल ते 17 एप्रिलपर्यंत भागवत सप्ताहाचे आयोजन केले आहे. हेरंब देऊळकर हे रोज सायंकाळी 5 ते 8.30 या वेळेत भागवतावर कथा सांगत आहेत.

नंदगडमध्ये गुढीपाडव्यानिमित्त मंदिरांतून विशेष पूजा

गुढीपाडव्यानिमित्त नंदगड गावातील विविध देवदेवतांच्या मंदिरात विशेष पूजा करण्यात आली. नंदगड गावातील कलमेश्वर मंदिर, सातेरी माउली, दुर्गादेवी लक्ष्मी, मरेव्वा, रवळनाथ या मुख्य मंदिरांसह अन्य मंदिरांतून वेशेष पूजा झाली. नंदगड गावातील नागरिकांसह माहेवासिनी मोठ्याप्रमाणात देवाचे दर्शन घेऊन काही मंदिरांतून ओट्या भरल्या. मंगळवारी दिवसभर मंदिरांतून गर्दी दिसून येत होती. शिवाय सायंकाळी सातेरी माउली देवीची व दुर्गादेवीची उत्सव मूर्ती पालखीत ठेवून मिरवणूक काढण्यात आली.

श्री स्वामी समर्थ केंद्राच्यावतीने पालखीचे आयोजन, आज महाप्रसाद

शहरातील स्वामी समर्थ केंद्रात गुढी पाडव्यानिमित्त विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी दुपारी 4 वाजता केंद्रातून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे पूजन करण्यात आले. शहरातील मठ गल्ली, घोडे गल्ली, निंगापूर गल्ली, शिवस्मारक, स्टेशनरोड, चिरमुरकर गल्ली, केंचापूर गल्ली, चौराशी देवी मंदिर, घाडी, गुरव गल्ली, बेंद्रे चौक, विठोबा देव गल्ली, अर्बन बँक चौक यासह विविध मार्गावरुन हा पालखी मिरवणूक काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीत समर्थ केंद्राचे भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बुधवार दि. 10 रोजी श्री स्वामी जयंतीनिमित्त स्वामी समर्थ केंद्रात विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले असून सकाळी 8 वाजता श्री स्वामी याग करण्यात येणार असून त्यानंतर दुपारी 12.30 नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.