For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहर परिसरात गुढीपाडवा उत्साहात

10:53 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहर परिसरात गुढीपाडवा उत्साहात
Advertisement

बेळगाव : घरोघरी उभारलेल्या गुढी, प्रवेशद्वारांवर लावण्यात आलेले आंब्याचे तोरण, घरांसमोर रेखाटलेले चैत्रांगण, पुरणावरणाचा गोडाधोडाचा स्वयंपाकाचा बेत, सहभोजनाचा आनंद आणि त्याचबरोबरीने सोने किंवा अन्य वस्तुंची खरेदी करण्यासाठी झालेली गर्दी असे चित्र गुढीपाडव्यादिवशी पाहायला मिळाले. हिंदु पंचांगांनुसार नववर्षाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा करून होते. गुढीपाडवा साजरा करण्याच्या वेगवेगळ्या आख्यायिका आहेत. त्यामध्ये प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून अयोध्येमध्ये परतले तो दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. काही ठिकाणी ब्रम्हदेवाने सृष्टी निर्माण केलेला हा दिवस. तर भगवान शंकराने शंकासुराचा म्हणजेच आसुरी शक्तींचा नाश केलेला हा दिवस. तसेच शालीवाहन राजाने शकगणनेला सुरुवात केलेला हा दिवस, असे मानले जाते. अर्थात नवर्षारंभ म्हणजे उत्साहाला उधाण येतेच. साडेतीन मुहूर्तांमध्ये खरेदीसाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या दिवशी खरेदी केली जाते. शहरवासीयांनी सकाळी काठीला रेशमी वस्त्र बांधून त्यावर कलश पालथा घालून साखरेच्या गाठ्यांची माळा आणि सुगंधीत हार घालून गुढी सुशोभीत करून कुटुंबीयांच्या समवेत गुढी उभारली. याच दिवशीपासून महिला चैत्रांगण रेखाटतात. यामध्ये श्रीराम-सीता, लक्ष्मी-सरस्वती, शंकचक्र, गदा, हस्त, कमळ, गाय-वासरू, स्वस्तिक अशी एकूण 40 हून अधिक सुचिन्हे रेखाटली जातात.

Advertisement

मंदिरांमध्ये पाडव्यानिमित्त विशेष पूजा-अर्चा करण्यात आली. या शिवाय घरोघरी तसेच मंदिरांमध्ये पंचांग वाचन करण्यात आले. पंचांग श्रवण करण्यासाठी मंदिरांमध्ये गर्दी झाली होती. पाडव्याला पक्वान्न हवेच. त्यामुळे घरोघरी श्रीखंड, बासुंदीचे बेत झाले. अर्थात मिठाईच्या दुकानांमध्येसुद्धा नामवंत ब्रॅन्ड्सची उत्पादने उपलब्ध होतीच. बहुसंख्य घरांमध्ये आजही पाडव्याला सोने खरेदी केले जाते. त्यामुळे शहरातील सर्व सोने विक्रीच्या दालनांमध्ये, सराफी पेढ्यांवर सकाळपासूनच गर्दी झाली होती. विशेष म्हणजे मंगळवार हा व्यापाऱ्यांच्या सुटीचा दिवस असला तरी पाडव्याचे महत्त्व लक्षात घेऊन आणि खरेदी होणार याचा अंदाज आल्याने सर्व व्यापाऱ्यांनी आणि सराफांनी आपली दुकाने सुरू ठेवली होती. इलेक्ट्रॉनिक वस्तुंची खरेदी करण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. दुचाकी किंवा चार चाकीची आगावू नोंदणी करून ठेवलेल्या लोकांनी शोरुम्समध्ये गर्दी केली. पाडव्याच्या मुहूर्तावर वाहन घरी आणण्याचा आनंद और होता. मात्र, शोरुम्समधील कर्मचाऱ्यांची बरीच धावपळ झाली. वॉशिंग मशीन, फ्रीज, ओव्हन, एसी, कुलर यांची खरेदीही तेजीत झाल्याचे दुकानदारांनी सांगितले. दरम्यान, या खरेदीबरोबरच अलीकडच्या काळात तरुणाई मात्र मोबाईल खरेदीवर भर देत आहे. अर्थात मोबाईलच्या दुकानातही तरुणाईची गर्दी दिसून आली.

Advertisement
Advertisement
Tags :

.