Solapur Politics | पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, पाटलांची अस्तित्वाची लढाई
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी ९९ टक्के मतदान झाले
पंढरपूर : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी ९९ टक्के मतदान झाले आहे. सुरुवातीला सोपी वाटणारी निवडणूक नंतर चुरस निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीकडे पालकमंत्री जयकुमार गोरे व मोहिते-पाटील गटाने लक्ष केंद्रित केले होते. यामुळे ही निवडणूक अटीतटीची झाली असल्याचे पहावयास मिळाले आहे.
विधान परिषद निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून मोहिते-पाटील गटाची अस्तित्वाची लढाई असल्याचे दिसून येत आहे. सोलापूर जिल्ह्यात भाजपची ताकद असल्यामुळे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याकडे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लक्ष केंद्रित केले होते.
मात्र यामध्ये गोरे यांना यश आले नाही. या निवडणुकीमध्ये भाजपने माजी आमदार राजेंद्र राऊत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने वसंतनाना देशमुख यांना उमेदवारी दिली. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र यामध्ये त्यांना यश आले नाही.
कारण यानिवडणुकीमध्ये मोहिते-पाटील गटाने लक्ष केंद्रित केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीची जबाबदारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे दिली. यामुळे गोरे यांनी भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा प्रचार करण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. प्रत्येक तालुक्यात जाऊन त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या.
पालकमंत्री गोरे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यामध्ये तळ ठोकला असल्याचे दिसून आले. तर या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच उमेदवार वसंतनाना देशमुख यांना विजयी करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी लक्ष केंद्रित केले होते.
त्यांनीही बैठका घेऊन निवडणुकीची मोर्चेबांधणी केली होती. या निवडणुकीमध्ये अदृश्य शक्ती वसंतनाना देशमुख यांना मदत करणार असल्याचे मोहिते-पाटील यांनी सांगितले. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली होती. विधान परिषदेसाठी १८ जून रोजी मतदान घेण्यात आले. यामध्ये ६१६ पैकी ६१४ मतदारांनी मतदान केले.
९९ टक्के मतदान उमेदवार राजेंद्र राऊत, वसंतनाना देशमुख दोघांनाही विजयाचा दावा केला आहे. मात्र मतमोजणी सोमवार, २२ जून रोजी होणार आहे. यामुळे कोण विजयी होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत ही निवडणूक पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिष्ठा पणाला लावणारी तर मोहिते पाटील गटाची अस्तित्वाची असल्याचे दिसून आले आहे.