“असा फालतूपणा खपवून घेणार नाही”, खेड विश्रामगृहाच्या निकृष्ट कामावर पालकमंत्री उदय सामंत संतापले!
चिपळूण : खेड येथील शासकीय विश्रामगृहाची दोन वर्षांतच दुरवस्था झाल्याने पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. निकृष्ट कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, “असा फालतूपणा खपवून घेणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
खेड विश्रामगृहाची पाहणी करताना इमारतीची झालेली दुरवस्था सामंत यांच्या निदर्शनास आली. सरकारी निधीतून काम करण्यात आले असताना अवघ्या दोन वर्षांतच त्याची अवस्था खराब झाल्याने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे जाब विचारला.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व संबंधितांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश सामंत यांनी दिले. तसेच कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विश्रामगृहातील साहित्याच्या खरेदीबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. सुमारे २ हजार रुपयांची खुर्ची तब्बल २२ हजार रुपयांना लावल्याचा आरोप सामंत यांनी केला. दरवाजांच्या निकृष्ट कामावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
“सरकारी पैसा खर्च होत आहे, त्यामुळे कामाचा दर्जाही तितकाच दर्जेदार असला पाहिजे,” असे सामंत यांनी स्पष्ट केले. संबंधित कामाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान, खेड विश्रामगृहाच्या निकृष्ट कामाच्या प्रकरणात चौकशीअंती नेमकी कोणती कारवाई होते आणि दोषींवर एफआयआर दाखल होतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.