पैसे घेतलेल्या नेत्यांची नावे पालकमंत्र्यांनी उघड करावीत
मच्छीमारी नेते गणपती मांगरे यांचे बंदर खात्याच्या मंत्र्यांना आव्हान
कारवार : जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील तालुक्यात (होन्नावर, अंकोला आणि कारवार) खासगी बंदरे उभारण्यासाठी मच्छीमारी समाजातील कोणत्या नेत्यांनी पैसे घेतले आहेत अशा नेत्यांची नावे जिल्हा पालकमंत्री आणि बंदर खात्याचे मंत्री मंकाळू वैद्य यांनी उघड करावीत, असे जाहीर आव्हान मच्छीमारी नेते गणपती मांगरे यांनी केले आहे. येथील पत्रकार भवनात पत्रकारांशी बोलताना मांगरे पुढे म्हणाले, बंदर योजनासाठी काही जणांनी रक्कम छावली आहे, असे वक्तव्य करून मंत्री वैद्य यांनी मच्छीमारी बांधवांमध्ये दुफळी माजविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. कोणी पैसे घेतले आहेत त्यांची नावे जाहीर करावीत, असा आग्रह करून मांगरे पुढे म्हणाले, या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे निवेदन देणार आहोत, या निवेदनाद्वारे कोणी पैसे घेतले आहेत, याची चौकशी करावी आणि पैसे घेतलेल्यांची नावे उघड करावीत, अशी मागणी करणार आहोत.
मासेमारी समाजाचा विरोध असतानाही बंदरे लादण्याचा प्रयत्न
जिल्ह्यातील नियोजित बंदरांना मासेमारी समाजाचा विरोध असतानाही ही बंदरे लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. बंदरे उभारुन मासेमारी समाजाला दशोधडीला लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. होन्नावर तालुक्यातील टोक-कासरकोड आणि अंकोला तालुक्यातील टोक येथील नियोजित खासगी बंदराच्या बरोबरीने सागरमाला कार्यक्रमांतर्गत येथील बंदराचाही विस्तार करण्यात येणार आहे, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.तथापि, येथील बंदराचा विस्तार कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. राज्यात सर्वात लांब किनारा कारवार जिल्ह्यात आहे.
समुद्रकिनाऱ्यावर वक्रदृष्टी
तथापि, येथील किनारे बंदर उभारणीसाठी विकण्याचा प्रयत्न सुरू आहे. 25 ते 30 वर्षांनंतर पहिल्यांदा या जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यावर वक्रदृष्टी पडली.