बळींच्या कुटुंबीयांना पालकमंत्र्यांची दोन लाखांची मदत
खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्याकडून घोषणा
बेळगाव : प्रयागराज येथील कुंभमेळ्यात पुण्यस्नानावेळी चेंगराचेंगरीत बेळगावच्या चार नागरिकांचा बळी गेला. या भाविकांचे मृतदेह नुकतेच बेळगाव येथे आणण्यात आले. चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी सांबरा येथील विमानतळावर मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्याचबरोबर जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यावतीने भाविकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी केली. कुंभमेळ्यासाठी गेलेल्या बेळगावच्या नागरिकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना यातून सावरण्यासाठी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आर्थिक मदत देऊ केली आहे.
प्रियांका जारकीहोळी यांनी त्यांच्या कुटुंबीयांची विमानतळ, तसेच काहींच्या घरी जाऊन सांत्वन केले. काही भाविकांचे मृतदेह गुरुवारी बेळगावच्या सांबरा विमानतळावर दाखल झाले. यावेळी खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, चेंगराचेंगरीची झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असून त्यांच्या कुटुंबीयांना दु:खातून सावरण्याचे बळ मिळो, असे त्यांनी सांगितले. त्यांच्यासमवेत मलगौडा पाटील, तसेच इतर सदस्य उपस्थित होते. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी या घटनेचा शोक व्यक्त केला आहे. मृत भाविकांच्या आत्म्याला चिरशांती लाभो, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची परमेश्वर शक्ती देवो, असा शोकसंदेश दिला आहे.