दोडामार्गात भूमिगत वीज वाहिन्यांसाठी पालकमंत्री नितेश राणेंकडून हिरवा कंदील
दोडामार्ग – वार्ताहर
दोडामार्ग तालुक्यासाठी भुमिगत वीजवाहिन्याद्वारे वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मस्त्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी पालकमंत्री राणे यांनी याबाबत हिरवा कंदील दाखवला असून लवकरच भूमिगत वीज वाहिन्या घालण्यात येतील अशी ग्वाही दिली. त्यामुळे अनेक वर्षांपासून भेडसावणारी समस्या मार्गी लागण्याची आशा पल्लवित झाली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून दोडामार्ग तालुक्यातील वीज समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. थोडाजरी वारा पाऊस आला तरी कित्येक तास वीजेपासून तालुकावासियांना वंचित राहावे लागते. त्यामुळे शासकीय कार्यालये, बँका, बाजारपेठ व इतर सर्व ठिकाणची कामे ठप्प होतात. तसेच दुर्गम भागातून तालुक्याच्या ठिकाणी दोडामार्ग शहरात आलेल्या गोरगरीब जनतेची पण मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. दोडामार्ग तालुका हा अतिशय दुर्गम, डोंगराळ, जंगल भाग असल्यामुळे या भागात वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य वीजवाहिन्या या भुमिगत पध्दतीने घातल्या तर ही समस्या आटोक्यात येवू शकते त्यामुळे आम्ही आपल्याला विनंती करतो की आपल्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्यासाठी भुमिगत वीजवाहिन्याव्दारे वीज पुरवठा करण्यात यावा व कित्येक वर्षे दोडामार्ग तालुक्याला भेडसावणारी वीज समस्या संपुष्टात आणावी अशी मागणी यावेळी नानचे यांनी केली. त्यावेळी पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, दोडामार्ग तालुक्यात येणारी मुख्य वीज वाहिनी ही भूमिगत स्वरूपात असावी यासाठी आपले वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. भूमिगत वीज वाहिनी घालण्यात येणार आल्याची ग्वाही मी देतो असेही पालकमंत्री राणे म्हणाले. यावेळी नानचे यांच्यासोबत नगरसेवक रामचंद्र ठाकूर, सोनल म्हावळणकर, तळकट सरपंच सुरेंद्र सावंतभोसले, सुनील म्हावळणकर आदी उपस्थित होते.
समस्यांपुढे अधिकारी , कर्मचारी हतबल...
पावसाळा सुरू झाला किंवा अचानक आलेले छोटे - मोठे वादळ यांमुळे जंगल भागातील झाडांच्या फांद्या किंवा मुळासकट झाडच पडून वीज वाहिन्या तुटतात. त्यामुळे तालुक्यातील बत्ती गुल होत होती. त्याशिवाय कर्मचाऱ्यांनी जर जंगल भागातील एखादा फॉल्ट शोधून त्यात सुधारणा केली तर काही काळाने नवीनच फॉल्ट निर्माण व्हायचा. त्यामुळे दिवसरात्र काम करून सुद्धा तालुक्यात वीज थांबत नव्हती. त्यामुळे महावितरण विरोधात ग्राहकांचा रोष अधिकच वाढत आहे. मात्र आता पालकमंत्री राणे यांनी भूमिगत वीज वाहिन्यांसाठी हिरवा कंदील दाखवल्याने सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत.