सरकारी कामात अडथळा प्रकरणी पालकमंत्री नितेश राणे निर्दोष
मात्र, सार्वजनिक शांतता भंग प्रकरणी 1 महिना कारावास आणि 1 लाख रुपये दंड ; शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात जाणार
कणकवली येथील महामार्ग चिखलफेक प्रकरण
अन्य 29 संशयित निर्दोष
प्रतिनिधी / ओरोस
महामार्ग अभियंत्यावर चिखलफेक करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मात्र सार्वजनिक शांततेचा भंग करणे व शांतता भंग करण्यास इतरांना उद्युक्त करणे या कलमाखाली त्यांना दोषी धरून एक महिना कारावास आणि एक लाख रुपये दंड अशी शिक्षाही ठोठावण्यात आली. जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी आज हा निकाल दिला. तर या प्रकरणातील अन्य 29 संशयित मात्र निर्दोष सुटले आहेत.दरम्यान ,या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली जाणार असून तोपर्यंत या शिक्षेला स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती ॲड. संग्राम देसाई यांनी दिली.मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाच्या पाहणीसाठी कणकवली विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार नितेश राणे यांनी महामार्ग अभियंता प्रकाश शेडेकर यांना बोलावून घेतले होते. आमदारांनी बोलावल्याने पाहणीसाठी कणकवली येथील गडनदी पुलावर दाखल झालेल्या शेडेकर यांच्या अंगावर चिखल ओतण्यात आला होता. तसेच त्यांना बांधून ठेवले व त्यानंतर चिखलातून चालत नेले होते. 4 जुलै 2019 रोजी ही घटना घडली होती.या प्रकरणी प्रकाश शेडेकर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारी नुसार नितेश राणे यांच्यासह अन्य 29 अशा एकूण 30 संशयित आरोपींवर भा. द.वि कलम 353, 332, 342, 324, 147, 143, 148, 149, 323, 504, 506, 109,120 (ब) सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले.