For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुखाच्या संसारासाठी नातेसंबंध आपुलकीने जपा

09:50 AM Mar 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुखाच्या संसारासाठी नातेसंबंध आपुलकीने जपा
Advertisement

मराठी सिनेअभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांचे प्रतिपादन : मंडोळी येथे आयोजित महिलांच्या स्नेहमेळाव्याला अलोट गर्दी

Advertisement

वार्ताहर /किणये

महिलांनी आपल्या सासू-सासऱ्यांबरोबर आई-वडिलांप्रमाणेच वागले पाहिजे. तसेच सुखाच्या संसारासाठी नातेसंबंध आपुलकीने जपले पाहिजेत. प्रत्येक लेकीला आपल्या माहेराची ओढ असते. महिलांना माहेर आणि सासर अशा दोन्ही कुटुंबांची काळजी घ्यावी लागते. व्यक्तिगत आयुष्यात कितीही संकटे आली तरी संकटांना घाबरू नका. धाडसाने संकटांचा सामना करा. आज महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत. ग्रामीण भागातील महिलांनीही आपल्या मुलींना उच्चशिक्षण देण्यासाठी अधिक प्रयत्न करायला पाहिजेत, असे मनोगत मराठी सिनेअभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांनी मंडोळी येथे व्यक्त केले. मंडोळी गावातील मारुती मंदिर, कलमेश्वर मंदिर व विठ्ठल-रखुमाई मंदिर जीर्णोद्धार कमिटी व ग्रामस्थ यांच्यावतीने गुरुवारी सकाळी महिलांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून माहेरची साडी फेम मराठी सिनेअभिनेत्री अलका कुबल-आठल्ये उपस्थित होत्या. त्या पुढे म्हणाल्या, महिलांनी शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी धडपड केली पाहिजे. संसार करीत असताना आपल्या कलागुणांनाही प्रोत्साहन दिले पाहिजे. असे सांगत त्यांनी माहेरची साडी या चित्रपटातील ‘चला घालूया जागर’ हे गीत स्वत: गायिले आणि उपस्थित महिलांची वाहव्वा मिळविली. तसेच सासू-सासऱ्यांच्या पाठिंब्यामुळे मी सिनेमा क्षेत्रात काम करू शकले, असे त्यांनी आवर्जून सांगितले. मंडोळी गावातील पुरातन जागृत मारुती मंदिर, कलमेश्वर मंदिर व विठ्ठल-रखुमाई मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे. याचे कामकाजही जोमाने सुरू आहे.

Advertisement

या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी गावातील माहेरवाशीनींचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या स्नेहमेळाव्याला महिलांची अलोट गर्दी झाली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्ष सुवर्णा होसकोटी या होत्या. गणेश प्रतिमापूजन माजी जिल्हा पंचायत सदस्या प्रेमा मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. मारुती प्रतिमा पूजन विजयकुमार दळवी, ज्ञानेश्वर प्रतिमा पूजन महेश भोसले यांनी केले. तसेच प्रवीण बेळगावकर, नीरा काकतकर, गायत्री पाटील, अंजली पाटील आदींच्या हस्ते विविध प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर सरिता पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्या माधुरी हेगडे, माजी नगरसेविका सुधा भातखंडे, माधुरी नेवगिरी या उपस्थित होत्या. प्रमुख वक्त्या म्हणून माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, डॉ. सोनाली सरनोबत, डॉ. मधुरा गुरव, स्वाती चौगुले, कमल मनोळकर उपस्थित होत्या. महिलांचीही भाषणे झाली. माहेरची साडी या प्रसिद्ध मराठी चित्रपटामुळे अलका कुबल या प्रत्येक महिलेला आपल्याशा वाटतात. तसेच त्यांनी अनेक कौटुंबिक व भावनात्मक चित्रपटांतून काम केले आहे. त्यामुळे त्यांचा चाहतावर्ग बेळगावमध्येही मोठ्या प्रमाणात आहे. मंडोळीतील महिला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या स्नेहमेळाव्यात अनेक महिलांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आपण पहिल्यांदाच अनुभवला, असेही अनेक महिलांनी आपल्या भाषणातून सांगितले.

 

Advertisement
Tags :

.