गरीबांना आर्थिक, सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ‘गॅरंटी’
युवानिधी योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात सिद्धरामय्या यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ बेंगळूर
विधानसभा निवडणुकीवेळी आपल्या पक्षाने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केली आहे. गरीब आणि मध्यमवर्गीयांना आर्थिक-सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पाच गॅरंटी योजनांची अंमलबजावणी केली आहे. या योजनांच्या माध्यमातून गरीबांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले सरकार कटीबद्ध आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.
शिमोगा येथील फ्रीडम पार्क मैदानावर शुक्रवारी सिद्धरामय्या यांनी ‘युवानिधी’ योजनेचा शुभारंभ केला. कार्यक्रमप्रसंगी त्यांनी सहा बेरोजगार तरुणांना सांकेतिकपणे धनादेशाचे वितरण करून काँग्रेस सरकारची पाचवी गॅरंटी योजना ‘युवानिधी’चा शुभारंभ केला. याप्रसंगी ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने युवानिधी योजना लागू करण्यात आलेली नाही. बेरोजगार तरुणांना मदत करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात आली आहे.
राज्यातील 1.18 कोटी महिलांना दरमहा 2,000 रुपये मानधन दिले जात आहे. जात, धर्म, भाषा यांचा विचार न करता शक्ती योजनेंतर्गत 130 कोटी मोफत तिकिटे मिळवून महिलांनी प्रवास केला आहे. 1.51 कोटी लोकांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जात आहे. अन्नभाग्य योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा 170 रुपये दिले जात आहेत. या सर्व तथ्यांची कोणीही पडताळणी करावी, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना दिले.
भत्त्याबरोबरच कौशल्य प्रशिक्षणही देणार
एका कुटुंबाला गॅरंटी योजनांमधून दरमहा 4,000 ते 5,000 रुपये आणि वर्षाला 48,000 ते 50,000 रुपये दिले जात आहेत. त्याचा फायदा गरीब लोकांना होतो. महागाई आणि बेरोजगारी अधिक असून या योजनांमुळे गरिबांना अनुकूल होत आहे, असे ते म्हणाले. युवानिधी योजनेतून बेरोजगार पदवीधरांसाठी दरमहा 3000 रु. आणि डिप्लोमा केलेल्या बेरोजगारांना 1,500 रुपये दोन वर्षांसाठी भत्ता दिला जाणार आहे. या कालावधीत भत्त्यासह रोजगार मिळवण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणही दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.
गॅरंटी योजना खिसे भरण्यासाठी नव्हेत : डी. के. शिवकुमार
आम्ही राज्यातील जनतेला पाच गॅरंटी योजनांचे आश्वासन दिले होते. आज या पाचही गॅरंटी योजना समर्पित केल्या असून तुमच्यासमोर उभे आहे. या योजना जनतेचे खिसे भरण्यासाठी नव्हेत; तर आर्थिक, सामाजिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी, कुटुंबाचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी, मनोबल उंचावण्यासाठी, जीवनात बदल घडविण्यासाठी जारी केल्या आहेत. आपले सरकार बोलल्याप्रमाणे करून दाखवत आहे, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.
युवा वर्गाने भवितव्य घडवावे : मधू बंगारप्पा
राज्यातील युवा वर्गाच्या पाठिशी राहून त्यांच्या विकासासाठी आपले सरकार सदैव कटिबद्ध आहे. युवा वर्गाने या योजनेचा सदुपयोग करून आपले भवितव्य घडवावे, अशी हाक शालेय शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांनी दिली. मलनाड भागातील शिमोग्यात युवनिधी योजनेचा शुभारंभ करणे ही बाब आपल्यासाठी अभिमानास्पद असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमासाठी मंत्री डॉ. एम. सी. सुधाकर, के. जे. जॉर्ज, बी. नागेंद्र, मंकाळू वैद्य, मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव गोविंदराज, आमदार बेलूर गोपालकृष्ण, बी. के. संगमेश्वर, डी. जी. शांतनगौडा, पूर्या नायक, डी. एस. अरुण तसेच चित्रदुर्ग, हावेरी, चिक्कमंगळूर, दावणगेरे, कारवार यासह इतर जिह्यांमधून लाखो लोक उपस्थित होते