गॅरंटी योजना थांबणार नाहीत!
मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे अधिकृत स्पष्टीकरण : राजकीय फायद्यासाठी विरोधी पक्षाकडून संभ्रम
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर
राज्यात गृहलक्ष्मी आणि गृहज्योतीसह कोणतीही गॅरंटी योजना थांबणार नाही. या काँग्रेस सरकारच्या अभिमानास्पद योजना आहेत आणि त्या शंभर टक्के सुरूच राहतील. विरोधी पक्ष राजकीय फायद्यासाठी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याकरिता खोट्या बातम्या पसरवत आहेत. जनतेसह महिलांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केले आहेत.
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘गृहलक्ष्मी’ आणि ‘गृहज्योती’ योजनांचा गैरवापर रोखण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. या संदर्भात, पात्र लाभार्थ्यांच्या पुनर्तपासणीसाठी पुन्हा अर्ज करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. मात्र, हा आदेश पुढे ठेवून विरोधी पक्ष भाजपने काँग्रेस सरकारने गॅरंटी योजना थांबवण्याचा कट रचला आहे, अशी टीका केली आहे. दरम्यान, विरोधी पक्षांच्या या आरोपांना सडेतोड उत्तर देताना मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे.
पुन्हा अर्ज करण्यामागील खरे कारण?
योजनांमध्ये सुधारणा करण्यासह नवीन अर्ज सादर करण्याच्या विनंतीमागे असलेले खरे कारण सरकारने उघड केले आहे. राज्यातील काही नागरिक मृत व्यक्तींच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून आणि बँक खाती उघडून योजनेचा निधी व सुविधा बेकायदेशीरपणे मिळवत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. अशा मोठ्या प्रमाणावरील गैरवापर रोखणे आणि सरकारी निधी थेट पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचेल याची खात्री करणे, हा सरकारचा उद्देश आहे.
लाभार्थ्यांची पडताळणी अनिवार्य
अनियमितता रोखण्यासाठी गॅरंटी योजनांच्या लाभार्थ्यांच्या सत्यतेची पडताळणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या कारणास्तव, लाभार्थ्यांचे नाव, पत्ता आणि बँक खाते क्रमांक पुन्हा पडताळण्यासाठीच नवीन अर्ज सादर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे केवळ पारदर्शकता आणण्यासाठी उचललेले पाऊल आहे. याव्यतिरिक्त योजना रद्द करण्यासाठी नाही, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
काळजी करण्याची गरज नाही
कोणत्याही कारणास्तव काळजी करण्याची गरज नाही. योजना कोणत्याही अडथळ्याशिवाय पात्र लाभार्थ्यांपर्यंत सातत्याने पोहोचतील. सरकारी नियमांनुसार पुनर्पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून योजनांच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करावे असे आवाहनही मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी राज्यातील महिला आणि जनतेला केले आहे.