For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्नाटकातील गॅरंटी योजनांचा पंतप्रधानांना धसका

10:17 AM Apr 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
कर्नाटकातील गॅरंटी योजनांचा पंतप्रधानांना धसका
Advertisement

मुख्यमंत्री सिद्धरामय्या : दहा वर्षात मोदींकडून जनतेची दिशाभूल

Advertisement

उगारखुर्द : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेस पक्षाची एकंदरीत प्रगती पहावेना झाली आहे. राज्यात राबविण्यात आलेली विकासकामे आणि गॅरंटी योजना यामुळे केवळ काँग्रेस विरोधात खोटे आरोप त्यांच्याकडून करण्यात येत आहेत. मात्र मतदार बांधव त्यांना योग्य ती जागा दाखवून धडा शिकवतील. कर्नाटकात राबविलेल्या गॅरंटी योजनांचा आधार घेत मोदी गॅरंटी अशी कॉपी भाजपकडून करण्यात येत आहे. राज्यात 20 हून अधिक जागा काँग्रेस पक्षाचे उमेदवार जिंकतील. त्यामध्ये बेळगाव व चिकोडी मतदारसंघातील दोन्ही उमेदवार अधिक मताने विजयी होऊन लोकसभेत प्रवेश करतील, असा विश्वास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला. रविवारी उगार खुर्द येथील विहार क्रीडांगणावर लोकसभेच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या बोलत होते. ते पुढे म्हणाले, कर्नाटक राज्याच्या वाट्याचा निधी देण्याची मागणी करत असताना प्रारंभी नकार दिला होता. मात्र न्यायालयात दाद मागितल्याने केंद्र सरकारची गोची झाल्याने निधी मंजूर करण्यात आला आहे. भाजप आणि मोदींकडून राज्यात प्रचाराच्या दरम्यान केवळ काँग्रेस पक्षाला विरोध आणि आरोप करण्यात येत आहेत. त्यांनी दहा वर्षात कोणतीही प्रगती साधलेली नाही. केवळ आपल्या आडमुठेपणामुळे मतदारांना दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही, असेही त्यांनी सांगितले.

कागवाड मतदारसंघातील बसवेश्वर पाणी पुरवठा योजनेला यावर्षी चालना देण्यात येणार आहे. याशिवाय 135 तलाव भरण्याकरिता मंजूर झालेल्या निधीचे टेंडर काढण्यात येणार आहे. दरवर्षी कृष्णा नदीमध्ये पाण्याची अडचण निर्माण होते. याकरिता महाराष्ट्र सरकारशी चर्चा करून कायमस्वरूपी उन्हाळ्यामध्ये 3 टीएमसी पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून आमदार राजू कागे यांच्या मागणीला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रतिसादही दिला. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी, भाजपाचे नेते व प्रधानमंत्री केवळ खोटे आश्वासन देऊन जनतेला झुलवत आहेत. आम्ही पाच गॅरंटीची घोषणा करून त्या कार्यान्वित केल्या आहेत. आता केंद्रात सत्ता आल्यानंतर आणखीन महत्त्वाच्या पाच गॅरंटी योजना कार्यरत करणार आहोत. याचा लाभ मतदार बांधवांनी घ्यावा. आम्ही जे बोलतो तेच करतो, असेही त्यांनी सांगितले. जगदीश शेट्टर काँग्रेस पक्षात आले व विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले तरी आम्ही त्यांना विधान परिषदेवर घेत आमदार बनवले. त्यात त्यांना समाधान वाटले नाही. ते पुन्हा भाजपकडे गेले. या  प्रवृत्तीमुळे मतदार बांधव त्यांना धडा शिकवतील, असे सांगितले.

Advertisement

माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी, काँग्रेस पक्ष सर्व तळागाळातील जनतेच्या समस्या जाणून घेणारा पक्ष आहे. या पक्षाच्या पाठिशी मोठ्या प्रमाणात मतदार आहेत. खोटे बोल पण नेटाने बोल हाच भाजपचा उद्योग आहे हे मतदार जाणून आहेत, असे सांगितले. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी, काँग्रेस पक्षाने केलेल्या कामाचा फार मोठा परिणाम मतदारसंघात झाला असून उमेदवाराला वाढता पाठिंबा मिळत आहे. याबरोबरच ऐन उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई होऊ नये याकरिता घटप्रभा नदीतील डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. याशिवाय एक टीएमसी पाणी कृष्णा नदीत सोडण्यात येणार आहे, असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. कागवाडचे आमदार राजू कागे म्हणाले, 1300 कोटी रुपये खर्चून बसवेश्वर पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम आले टप्प्यात आहे. बसवेश्वर पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन तुमच्याच हस्ते येत्या जुलैमध्ये करावे. 150 कोटी रुपये खर्चून 135 तळ्यामध्ये पाणी सोडण्याच्या कामाचे टेंडर काढून लवकरच कामाला चालना द्यावी, अशी मागणी केली. यावेळी चिकोडीचे आमदार गणेश हुक्केरी, आमदार महेश तमन्नावर, माजी मंत्री वीरकुमार पाटील, ए. बी. पाटील, शशिकांत नाईक, पक्षाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, माजी आमदार मोहनराव शहा, काका पाटील, शामराव घाटगे, दिग्विजय पवार देसाई, चंद्रकांत इमडी, बसवराज भुटाळे, रमेश सिंदगी, शिवगौडा कागे, विजय अकिवाटे यांच्यासह रायबाग कुडची, अथणी, कागवाड विधानसभा मतदारसंघातील सुमारे 50 हजाराहून अधिक कार्यकर्ते सभेत सहभागी झाले होते.

गॅरंटी योजनांची कॉपी

काँग्र्रेसने राज्यात राबविलेल्या गॅरंटी योजनांची कॉपी करून मोदी गॅरंटी असा प्रचार करण्यात येत आहे. मात्र मतदार पूर्णपणे जाणून आहेत. यावेळी योग्य निर्णय होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.