For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गॅरंटी योजना ‘बेअसर’, भाजपच सरस

11:44 PM Jun 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
गॅरंटी योजना ‘बेअसर’  भाजपच सरस
Advertisement

काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे नसले तरी काहीसे दिलासादायक यश मिळाले आहे. पण गॅरंटी योजनांमुळे महिला मतदार काँग्रेसच्या बाजूने जातील, हा अंदाज फोल ठरला आहे. गॅरंटी योजनांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे गेलेल्या काँग्रेसला भाजपवर मात करता आलेली नाही. भाजपला 20 जागांचा आकडा गाठण्यात यश आलेले नसले तरी राज्यावरील पकड मात्र मजबूत ठेवली आहे. त्यामुळे कर्नाटकात केंद्रातील राजकारणाचा राज्य राजकारणावर मोठा असर पडत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Advertisement

लोकसभा निवडणुकीत भाजप-निजद युतीला अपेक्षेप्रमाणे जागा मिळाल्या आहेत. राज्य काँग्रेस सरकारने जारी केलेल्या गॅरंटी योजनांच्या जादूचा असर मतदारांवर पडला नसल्याचे दिसून आले आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देऊन घोडदौड कायम राखण्यासाठी आखलेली योजना फलद्रूप ठरली आहे. राज्यात अस्तित्वासाठी झगडणाऱ्या निधर्मी जनता दलाने भाजपच्या मदतीने दोन जागा मिळविल्या आहेत. भाजपला 17 आणि काँग्रेसला 9 जागा मिळाल्या आहेत. आपल्या कुटुंबातील सदस्याला लोकसभेवर पाठविण्यासाठी काँग्रेसच्या मंत्र्यांनी कंबर कसली होती. त्यात काहींना यशही मिळाले आहे. दरम्यान, राज्य काँग्रेसला सत्तेवर येऊन वर्ष उलटले असताना लोकसभा निवडणूक निकालाचा सरकारवर कितपत परिणाम होईल, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

मागील निवडणुकीत काँग्रेसशी युती केलेल्या निजदने यावेळी भाजपशी संधान बांधले. वाटाघाटीत केवळ 3 जागा वाट्याला आल्या. दोन ठिकाणी विजय मिळविला.  गतवेळेपेक्षा एक जागा मिळविण्यात निजदला यश मिळाले आहे. चक्क येडियुराप्पांना श•t ठोकणारे माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा पिछाडीवर पडले. त्यामुळे येडियुराप्पांची राज्यावरील पर्यायाने भाजपवरील पकड कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. ईश्वरप्पांनी बंडखोरी करून देखील शिमोगा मतदारसंघातून येडियुराप्पांचे पुत्र बी. वाय. राघवेंद्र निवडून आले आहेत.

Advertisement

अत्यंत लक्षवेधी ठरलेल्या बेंगळूर ग्रामीण, म्हैसूर, हासन, मंड्या या लोकसभा मतदारसंघांमध्ये उलथापालथ झाली आहे. लैंगिक शोषण प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या हासनचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांना मतदारांनी निवडणुकीत घरचा रस्ता दाखविला आहे. त्यामुळे काही प्रमाणात निजदची पिछेहाट झाली असली तर तीन पैकी दोन जागा मिळविण्यात यश आले आहे. त्यात मंड्या आणि कोलार मतदारसंघांचा समावेश आहे. अत्यंत प्रतिष्ठेचे मतदारसंघ असणाऱ्या बेंगळूर दक्षिण आणि म्हैसूर मतदारसंघांत काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला आहे. कारण या दोन्ही मतदारसंघांमध्ये पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वापरलेली ताकद कामी आलेली नाही, हेच दिसून आलेले आहे.

उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे बंधू खासदार डी. के. सुरेश पुन्हा निवडून येणार की वैद्यकीय क्षेत्रातून समाजसेवा केलेल्या डॉ. सी. एन. मंजुनाथ यांना लोकसभेत प्रवेश मिळणार, या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. भाजपचे डॉ. मंजुनाथ यांनी निवडणुकीत विजय प्राप्त केलाय. शिवकुमार यांनी सुरेश यांच्या विजयासाठी कंबर कसली होती, मात्र, त्यांच्या परिश्रमाचे चीज झाल्याचे दिसून आलेले नाही. वडेयर घराण्यातील यदूवीर वडेयर यांनी बाजी मारल्याने म्हैसूरमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे वर्चस्व कमी झाले की काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पक्षापेक्षा उमेदवार महत्त्वाचा असल्याचे चित्रही काही मतदारसंघांमध्ये दिसून आले आहे. कारण चिकोडी, हासन, बेंगळूर ग्रामीण मतदारसंघांमधील विद्यमान खासदारांना मतदारांनी नाकारले आहे. याच दरम्यान तीन माजी मुख्यमंत्र्यांना राज्य राजकारणातून राष्ट्रीय राजकारणासाठी संधी मिळाली आहे. बसवराज बोम्माई (हावेरी), जगदीश शेट्टर (बेळगाव), एच. डी. कुमारस्वामी (मंड्या) यांना लोकसभा निवडणुकीत विजयाची चव चाखता आली आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांची राष्ट्रीय राजकारणात मोठा बोलबाला असणारे नेते अशी ओळख आहे. त्यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत व्हावे लागले होते. नंतर ते राज्यसभेवर गेले. मात्र, या निवडणुकीत या दोन्ही नेत्यांनी जावयाला तिकीट दिले आहे. राधाकृष्ण दोडमनी हे खर्गेंचे जावई तर डॉ. मंजुनाथ हे देवेगौडांचे जावई. या दोघांचे राजकीय नशीब फळाला आले.

किनारपट्टी आणि मलनाड भागात भाजपने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. या भागातील कारवार, मंगळूर, उडुपी-चिक्कमंगळूर, कोडगू-म्हैसूर या मतदारसंघांमध्ये  भाजप उमेदवारांचे पारडे जड ठरले. परंतु, हैदराबाद-कर्नाटक भागात म्हणजेच कल्याण कर्नाटक भागात काँग्रेसने गतवैभव प्राप्त केले आहे. या भागातील बिदर, गुलबर्गा, बळ्ळारी, रायचूर, कोप्पळ या पाचही लोकसभा मतदारसंघांत विजयश्री खेचून आणली आहे.

विनोद खामकर

Advertisement
Tags :

.