For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सामाजिक समानतेसाठीच गॅरंटी योजना!

10:50 AM Dec 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
सामाजिक समानतेसाठीच गॅरंटी योजना
Advertisement

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे विधानसभेत प्रतिपादन

Advertisement

बेंगळूर : कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सामाजिक समानता, बुद्ध, बसवेश्वर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरही चर्चा झाली. स्वत: मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बाराव्या शतकातील सुधारक महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा उल्लेख केला. त्यानंतर आजही सामाजिक परिस्थिती कशी आहे? यावर मुख्यमंत्र्यांनी प्रकाश टाकला. बसवेश्वरांनी 850 वर्षांपूर्वी सामाजिक समानतेचा संदेश दिला. इतकी वर्षे उलटल्यानंतरही जातीय व्यवस्था नष्ट झाली आहे का?, सामाजिक समानता आली आहे का? असे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केले. प्रत्येकाला राजकीय, सामाजिक क्षेत्रात संधी मिळाली तरच समानता शक्य आहे. 25 नोव्हेंबर 1949 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक भाषण केले. आम्हाला राजकीय स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, सामाजिक, आर्थिक स्वातंत्र्य मिळाले नाही. याचा त्यांनी उल्लेख केला होता. या भाषणाचा उल्लेख करत सिद्धरामय्या यांनी, आर्थिक, सामाजिक स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय समाजात समानता येत नाही, असे त्यांनी सांगितले.

गॅरंटी योजनांमुळे दडरोई उत्पन्नात वाढ

Advertisement

सामाजिक असमानता दूर करण्यासाठीच आम्ही शक्ती योजना, गृहज्योती, गृहलक्ष्मी आदी योजना अस्तित्वात आणल्या आहेत. त्यामुळेच दरडोई उत्पन्नात वाढ झाली आहे. 850 वर्षांपूर्वीच महात्मा बसवेश्वरांनी जातीव्यवस्थेवर आघात केला तरी आजही ही व्यवस्था नष्ट झाली नाही, अशी खंतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. आज साक्षरता वाढली तरी जातीव्यवस्था कायम आहे. याला काय म्हणायचे? नशीब, पाप, पुण्य, कर्मफळामुळे मी गरीब आहे, असे अनेक जण सांगत असतात. बसवेश्वरांनी याच अनिष्ट रुढींवर आघात केला. आम्ही आजही गुलामगिरीच्या मन:स्थितीत जगत आहोत. एखादा श्रीमंत दलित समोर आला तर त्याचा एकेरी उल्लेख होतो. उच्चवर्णीय गरीबाचा आदराने उल्लेख केला जातो. जात नष्ट झाल्याशिवाय समानता शक्य नाही, असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.