‘गॅरंटी’चे लाभार्थी रेशनकार्डच्या प्रतीक्षेत
नवीन रेशनकार्डचे काम रेंगाळले : लाभार्थी योजनेपासून वंचित
बेळगाव : काँग्रेस सरकारने गॅरंटी योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र, काही लाभार्थ्यांच्या पदरात रेशनकार्ड नसल्याने गॅरंटी योजनेतील अन्नभाग्य आणि गृहलक्ष्मी योजनेपासून वंचित राहावे लागले आहे. शिवाय नवीन रेशनकार्डचे कामही कित्येक दिवसापासून रखडल्याने लाभार्थ्यांची अपेक्षा केवळ अपेक्षाच राहिली आहे. सरकारने अन्नभाग्य योजनेंतर्गत प्रति व्यक्ती 34 रुपये देऊ केले आहेत. त्याबरोबर गृहलक्ष्मी अंतर्गत कुटुंबातील महिलेला मासिक 2 हजार रुपये दिले जात आहेत. मात्र काही लाभार्थ्यांची नावे रेशनकार्डमध्ये नाहीत. त्यांना अन्नभाग्यपासून वंचित राहावे लागत आहे. त्याबरोबर काही कुटुंबातील प्रमुख महिलांची नावेही रेशनकार्डमध्ये नाहीत. अशा लाभार्थ्यांना गृहलक्ष्मीपासून दूर राहावे लागले आहे. रेशनकार्डमध्ये दुरुस्तीची कामेही रखडली आहेत. शासनाकडून नवीन रेशनकार्ड आणि रेशनकार्ड दुरुस्तीची कामे सुरू केली जात नसल्याने लाभार्थ्यांना गॅरंटी योजनांपासून वंचित राहावे लागले आहे.
मागील कित्येक दिवसापासून रेशनकार्ड दुरुस्ती आणि नवीन रेशनकार्डच्या प्रतीक्षेत लाभार्थी आहेत. मात्र शासनाकडून या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे गॅरंटी योजनांबाबत लाभार्थ्यांतून संभ्रम निर्माण होऊ लागला आहे. नवीन रेशनकार्डसाठी हजारोंच्या संख्येने अर्जदाखल झाले आहेत. त्यामुळे लाभार्थी रेशनकार्ड वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान 15 दिवसांत नवीन रेशनकार्डचे वितरण करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला होता. मात्र अद्याप या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे अर्ज केलेल्या लाभार्थ्यांच्या पदरी निराशाच आहे. सद्य परिस्थितीत अंत्योदय आणि बीपीएल कार्डधारकांना 5 किलो तांदूळ आणि माणसी 34 रुपये प्रतिकिलो दराने उर्वरीत 5 किलोची रक्कम दिली जात आहे. मात्र काहींची रेशनकार्डमध्ये नावेच नसल्याने सुविधेपासून दूर रहावे लागले आहे. गॅरंटी योजनांची घोषणा झाल्यानंतर रेशनकार्डच्या मागणीत दुपटीने वाढ झाली आहे. मात्र दोन वर्षापूर्वी अर्ज केलेल्यांना अद्याप नवीन रेशनकार्ड मिळाले नाही. शिवाय नवीन रेशनकार्डसाठी अर्ज स्वीकृतीही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना अद्याप किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे.
बाळू बिर्जे, लाभार्थी
रेशनकार्डमध्ये कुटुंबातील प्रमुख व्यक्ती म्हणून पत्नीचे नाव नाही. त्यामुळे योजनेपासून वंचित रहावे लागले आहे. रेशनकार्डमध्ये पत्नीच्या नावाचा समावेश करण्यासाठी कित्येक दिवसापासून प्रतीक्षा करीत आहे. मात्र कामच सुरू नसल्याचे अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे योजना तळागाळातील लोकांना द्यायच्या नव्हत्या तर घोषणा कशाला केली.