गुजरातची मुंबईवर 55 धावांनी मात
आयपीएल 16 : गिलचे अर्धशतक, सामनावीर मनोहर, मिलर, तेवातियाची फटकेबाजी, नूर अहमदचे 3, रशिद खानचे 2 बळी
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
शुबमन गिलचे शानदार अर्धशतक, अखेरच्या टप्प्यात सामनावीर अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया यांनी केलेली जबरदस्त फटकेबाजी आणि भेदक गोलंदाजी यांच्या बळावर गुजरात टायटन्सने आयपीएलमधील साखळी सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 55 धावांनी धुव्वा उडवित पाचवा विजय नोंदवला. 21 चेंडूत 42 धावा फटकावणाऱ्या अभिनव मनोहरला सामनावीराचा बहुमान मिळाला.
प्रथम फलंदाजी मिळाल्यावर गुजरात टायटन्सने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 207 धावा जमवित मुंबई इंडियन्ससमोर कठीण आव्हान ठेवले होते. त्यानंतर अचूक व शिस्तबद्ध गोलंदाजी करीत मुंबईला 20 षटकांत 9 बाद 152 धावांवर रोखत गुजरातने विजय साकार केला.
208 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला प्रारंभापासूनच धक्के बसले. कर्णधार रोहित शर्मा 2 धावा काढून बाद झाल्यानंतर इशान किशन व ग्रीन यांनी 39 धावांची भर घातली. रशिद खानने इशानला बाद करीत ही जोडी फोडली. इशानने 13 धावा केल्या. तिलक वर्माही (2) लगेचच बाद झाल्यावर ग्रीनला नूर अहमदने त्रिफळाचीत केले. त्याने 26 चेंडूत 3 षटकारांच्या मदतीने 33 धावा काढल्या तर टिम डेव्हिड शून्यावर बाद झाला. सूर्यकुमार यादव व नेहाल वढेरा यांनी काही वेळ प्रतिकार करीत 31 धावांची भर घातली. पण नूर अहमदने सूर्याला स्वत:च्याच गोलंदाजीवर टिपत त्याला माघारी धाडले. सूर्याने 12 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह 23 धावा फटकावल्या.
वढेरा आक्रमक फटकेबाजी करीत होता. चावलासमवेत (12 चेंडूत 18) त्याने सातव्या गड्यासाठी 45 धावांची भागीदारी केली. पण ती मुंबईचा पराभव टाळण्यास पुरेशी ठरली नाही. चावला धावचीत झाल्यावर दोनच धावांची भर पडल्यावर वढेराही झेलबाद झाला. त्याने 21 चेंडूत 40 धावा फटकावताना 3 चौकार, 3 षटकार ठोकले. शेवटच्या षटकात अर्जुन तेंडुलकरही 9 चेंडूत 13 धावांवर बाद झाला. त्यात एका षटकाराचा समावेश होता. नूर अहमद गुजरातचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 37 धावांत 3, रशिद खान, मोहित शर्मा यांनी प्रत्येकी 2 व हार्दिकने एक बळी मिळविला. मुंबईचा हा 7 सामन्यातील चौथा पराभव आहे.
गुजरातची अखेरच्या टप्प्यात फटकेबाजी
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली आणि गुजरातला प्रथम फलंदाजी दिली. अचूक मारा करीत मुंबईच्या गोलंदाजांनी जखडून ठेवल्यामुळे गुजरातला पॉवरप्लेमध्ये 1 बाद 50 धावांपर्यंतच मजल मारता आली. मात्र अखेरच्या टप्प्यात मुंबईच्या दिशाहिन गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेत शेवटच्या चार षटकांत तब्बल 70 धावा झोडपल्याने गुजरातला दोनशे धावांचा टप्पा पार करता आला. मुंबईच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचाही त्यांना लाभ झाला.
शुबमन गिलने आपला फॉर्म कायम राखत या डावातही शानदार अर्धशतक नोंदवले. त्याने 34 चेंडूत 7 चौकार, एका षटकाराच्या मदतीने 56 धावा फटकावल्या. साहा (4), कर्णधार हार्दिक पंड्या (13) बाद झाल्यानंतर गिल तिसऱ्या गड्याच्या रूपात बाद झाला. विजय शंकरही 16 चेंडूत 19 धावा काढून बाद झाल्यानंतर गुजरातची स्थिती 12.2 षटकांत 4 बाद 101 अशी झाली होती. यानंतर अभिनव मनोहर व मिलर यांनी आक्रमक फटकेबाजी करीत धावांची गती वाढविली आणि केवळ 35 चेंडूत 71 धावांची भर घातली. मनोहर 21 चेंडूत 42 धावा फटकावत बाद झाला. त्याच्या खेळीत 3 चौकार, 3 षटकारांचा समावेश होता. राहुल तेवातिया व मिलर यांनी हा जोम कायम ठेवत केवळ 11 चेंडूत 33 धावा झोडपल्या. शेवटच्या षटकात उत्तुंग फटका मारताना मिलर झेलबाद झाला. त्याने 22 चेंडूत 2 चौकार, 4 षटकारांसह 209 च्या स्ट्राईक रेटने 46 धावा तडकावल्या. तेवातिया 5 चेंडूत 20 धावांवर नाबाद राहिला. त्यानेही आपल्या छोट्याशा खेळीत 3 षटकार मारले.
मुंबईतर्फे अर्जुन तेंडुलकर, बेहरेनडॉर्फ, रिली मेरेडिथ, ग्रीन, कुमार कार्तिकेय यांनी एकेक बळी मिळविले, त्यांनी बऱ्याच धावा दिल्या. बेहरेनडॉर्फने 37, मेरेडिथने 49, कार्तिकेयने 39 धावा दिल्या तर ग्रीनने केवळ 2 षटकांतच 39 धावा दिल्या. पीयूष चावलाने 34 धावा देत 2 बळी मिळविले. अर्जुन तेंडुलकरला दोनच षटके मिळाली, त्यात त्याने 9 धावा देत एक बळी टिपला.
संक्षिप्त धावफलक : गुजरात टायटन्स 20 षटकांत 6 बाद 207 : साहा 4, गिल 34 चेंडूत 56, हार्दिक पंड्या 14 चेंडूत 13, विजय शंकर 16 चेंडूत 19, डेव्हिड मिलर 22 चेंडूत 46, अभिनव मनोहर 21 चेंडूत 42, तेवातिया 5 चेंडूत नाबाद 20, रशिद खान नाबाद 2, अवांतर 5. गोलंदाजी : पीयूष चावला 2-34, अर्जुन तेंडुलकर 1-9, बेहरेनडॉर्फ 1-37, मेरेडिथ 1-49, ग्रीन 0-39, कुमार कार्तिकेय 1-39.
मुंबई इंडियन्स 20 षटकांत 9 बाद 152 : रोहित शर्मा 2, इशान किशन 21 चेंडूत 13, ग्रीन 26 चेंडूत 33, तिलक वर्मा 2, सूर्यकुमार यादव 12 चेंडूत 23, टिम डेव्हिड 0, नेहाल वढेरा 21 चेंडूत 40, चावला 12 चेंडूत 18, अर्जुन तेंडुलकर 9 चेंडूत 13, बेहरेनडॉर्फ नाबाद 3, अवांतर 5. गोलंदाजी : नूर अहमद 3-37, रशिद खान 2-27, मोहित शर्मा 2-38, हार्दिक 1-10.