For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

गुजरात टायटन्सची पुन्हा अग्रस्थानावर झेप

08:45 PM Apr 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
गुजरात टायटन्सची पुन्हा अग्रस्थानावर झेप

विजय शंकरचे नाबाद अर्धशतक, गुरुबाजचे अर्धशतक वाया, कोलकाता सात गड्यांनी पराभूत

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली विद्यमान विजेत्या गुजरात टायटन्सने 2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 स्पर्धेतील गुणतक्त्यात पुन्हा आघाडीचे स्थान पटकावले. या स्पर्धेतील शनिवारी येथे झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 13 चेंडू बाकी ठेवून 7 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या स्पर्धेत गुजरातने 8 सामन्यातून 6 विजय नेंदवत 12 गुणासह पुन्हा अग्रस्थान काबिज केले आहे. शनिवारच्या सामन्यात 25 धावात 2 गडी बाद करणाऱ्या गुजरात टायटन्सच्या जोश लिटलला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisement

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकात 7 बाद 179 धावा जमवल्या होत्या. त्यानंतर गुजरातने 17.5 षटकात 3 बाद 180 धावा जमवत या स्पर्धेतील आपला सहावा विजय नोंदवला. गुजरात टायटन्सतर्फे विजय शंकरने नाबाद अर्धशतक झळकवले. तर कोलकाताच्या गुरुबाजचे अर्धशतक वाया गेले. स्पर्धेच्या गुणतक्त्यात कोलकाता संघाने आतापर्यंत 9 सामन्यात 3 विजय आणि 6 पराभव नोंदवत सहा गुणासह सातवे स्थान मिळवले आहे.

Advertisement

साहा आणि गिल या सलामीच्या जोडीने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फटकेबाजीला प्रारंभ केला. 25 चेंडूत या जोडीने 41 धावा झोडपल्या. त्यामध्ये गिलचा वाटा अधिक होता. पाचव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर रसेलने साहाला झेलबाद केले. त्याने 1 चौकारासह 10 धावा जमवल्या. गुजरात टायटन्सने पॉवर प्ले दरम्यान 6 षटकात 52 धावा जमवताना एक गडी गमवला. गुजरातचे पहिले अर्धशतक 32 चेंडूत फलकावर लागले. कर्णधार पांड्या आणि गिल यांनी दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी 38 चेंडूत पूर्ण केली. त्यामध्ये गिलचा वाटा 20 धावांचा तर पांड्याचा वाटा 26 धावांचा होता. 11 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर हर्षित राणाने पांड्याला पायचित केले. त्याने 20 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 26 धावा जमवल्dया. पांड्या बाद झाल्यानंतर गिल सुनील नरेनच्या गोलंदाजीवर रसेलकडे सोपा झेल देत तंबूत परतला. त्याने 35 चेंडूत 8 चौकारासह 49 धावा झळकवल्या. गुजरातची यावेळी स्थिती 11.2 षटकात 3 बाद 93 अशी होती.

विजय शंकर आणि डेविड मिलर या जोडीने 6.3 षटकात अभेद्य 87 धावांची भागीदारी करत गुजरात टायटन्सला तब्बल 13 चेंडू बाकी ठेवून विजय मिळवून दिला. विजय शंकरने 24 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारासह नाबाद 51 तर डेविड मिलरने 18 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारासह नाबाद 32 धावा झळकवल्या. गुजरातला अवांतराच्या रुपात 12 धावा मिळाल्या. कोलकाता संघातर्फे हर्षित राणा, आंद्रे रसेल आणि सुनील नरेन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. गुजरातच्या डावामध्ये 8 षटकार आणि 15 चौकार नोंदवले गेले.

तत्पुर्वी या स्पर्धेतील या 39 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. पाटदुखापतीमुळे जेसन रॉयच्या गैरहजेरीत संघात पुनरागमन करणारा अफगाणचा सलामीचा फलंदाज गुरुबाजने आक्रमक फटकेबाजी करत केवळ 39 चेंडूत 7 षटकार आणि 5 चौकाराच्या मदतीने 81 धावा झोडपल्या. 2023 च्या आयपीएल हंगामातील गुरुबाजचे हे दुसरे अर्धशतक आहे. कोलकाताने पॉवर प्ले दरम्यान 6 षटकात 61 धावा जमवताना 2 गडी गमवले.

कोलकाताच्या डावाला सुरुवात झाल्यानंतर तिसऱ्या षटकात सलामीचा जगदीशन मोहमद शमीच्या गोलंदाजीवर पायचित झाला. त्याने 15 चेंडूत 4 चौकाराच्या मदतीने 19 धावा जमवल्या. गुरुबाजसमवेत त्याने 23 धावांची भागीदारी केली. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेला शार्दुल ठाकुर मोहमद शमीचा दुसरा बळी ठरला. शमीच्या गोलंदाजीवर शर्माने ठाकुरला खाते उघडण्यापूर्वीच टिपले. 5 षटकात कोलकाता संघाने 2 बाद 47 धावा जमवल्या होत्या. वेंकटेश अय्यर लिटलच्या गोलंदाजीवर पायचित झाला. त्याने 14 चेंडूत 11 धावा जमवल्या. लिटलने कोलकाता संघाला आणखी एक धक्का देताना कर्णधार नितीश राणाला 4 धावावर झेलबाद केले. कोलकाता संघाने यावेळी 10.4 षटकात 4 बाद 88 धावा जमवल्या होत्या. गुरुबाज आणि रिंकू सिंग यांनी पाचव्या गड्यासाठी 5.4 षटकात 47 धावांची भर घातली. गुरुबाजने कर्णधार पांड्याच्या एका षटकात 2 उत्तुंग षटकार खेचले. त्यानंतर त्याने शमीच्या गोलंदाजीवरही फटकेबाजी केली. गुरुबाज नूर अहमदच्या गोलंदाजीवर रशीद खानकरवी झेलबाद झाला. रिंकू सिंगने 20 चेंडुत 1 षटकारासह 19 धावा जमवल्या. तो सहाव्या गड्याच्या रुपात बाद झाला. 100 वा सामना खेळणाऱ्या आंद्रे रसेलने 19 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारासह 34 धावा झळकवल्याने कोलकाता संघाला 179 धावापर्यंत मजल मारता आली. शमीने त्याला झेलबाद केले. डेव्हिड विसे 1 षटकारासह 8 धावावर नाबाद राहिला. कोलकाता संघाच्या डावात 12 षटकार आणि 12 चौकार नोंदवले गेले. गुजरात टायटन्सतर्फे मोहमद शमीने 3 तर जोस लिटल व नूर अहमद यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. मात्र यावेळी रशीद खान प्रभावी ठरला नाही. त्याने आपल्या 4 षटकात 54 धावा दिल्या.

कोलकाता नाईट रायडर्स 20 षटकात 7 बाद 179 (जगदीशन 19, गुरुबाज 81, शार्दुल ठाकुर 0, वेंकटेश अय्यर 11, नितीश राणा 4, रिंकू सिंग 19, आंद्रे रसेल 34, डेविड विसे नाबाद 8, अवांतर 3 मोहमद शमी 3-33, जोश लिटल 2-25, नूर अहमद 2-21),

गुजरात जायंट्स 17.5 षटकात 3 बाद 180 (साहा 10, शुभमन गिल 49, हार्दिक पांड्या 26, विजय शंकर नाबाद 51, डेविड मिलर नाबाद 32, अवांतर 12, हर्षित राणा 1-25, रसेल 1-29, सुनील नरेन 1-24).

Advertisement
Tags :
×

.