For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जुलैमध्ये 2.11 लाख कोटी जीएसटी महसूल

06:45 AM Aug 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
जुलैमध्ये 2 11 लाख कोटी जीएसटी महसूल
Advertisement

गेल्यावर्षीच्या तुलनेत 15.4 टक्क्यांनी वाढ : सरकारी तिजोरीला बळ

Advertisement

वृत्तसंस्था

नवी दिल्ली

Advertisement

देशातील जीएसटी संकलनात जुलै 2026 मध्ये लक्षणीय वाढ होऊन ते 2.11 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.  सरकारने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत अहवालानुसार, जुलै 2026 मध्ये एकूण जीएसटी महसूल 2 लाख 11 हजार 205 कोटींवर पोहोचला. हे संकलन गेल्यावर्षीच्या याच कालावधीतील (जुलै 2025) 1 लाख 83 हजार 065 कोटींच्या तुलनेत 15.4 टक्क्यांनी वाढ दर्शवते. गेल्या 14 महिन्यांतील ही सर्वात जलद वाढ आहे. या आर्थिक वर्षात दुसऱ्यांदा मासिक संकलनाने 2 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

जुलै 2026 महिना भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी बातमी घेऊन आला आहे. देशाच्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनाने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. जीएसटी विभागाच्या माहितीनुसार, देशांतर्गत एकूण जीएसटी संकलन गेल्या वर्षीच्या 1.31 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत 10.1 टक्क्यांनी वाढून 1.45 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. आयातीतून मिळणाऱ्या जीएसटी महसुलातही 28.8 टक्क्यांची लक्षणीय वाढ नोंदवली गेली. हे संकलन जुलै 2025 मधील 51,626 कोटींवरून जुलै 2026 मध्ये 66,511 कोटींपर्यंत वाढले. यावरून परकीय व्यापार आणि आयातीमधील वाढीचा थेट परिणाम कर संकलनावर झाल्याचे स्पष्ट होते. तज्ञांच्या मते, जीएसटी महसुलातील ही वाढ मजबूत देशांतर्गत आर्थिक घडामोडी आणि वाढलेल्या आयातीमुळे झाली आहे.

निव्वळ महसूलासह परताव्यांमध्येही वाढ

परताव्यांची रक्कम समायोजित केल्यानंतर, निव्वळ जीएसटी महसूल 15.8 टक्क्यांनी वाढून 1.81 लाख कोटी झाला. देशांतर्गत निव्वळ महसूल 10.5 टक्क्यांनी वाढून 1.27 लाख कोटी झाला, तर सीमा शुल्काशी संबंधित निव्वळ जीएसटी संकलन 30.3 टक्क्यांनी वाढून 54,223 कोटी झाले. जुलै महिन्यातील एकूण जीएसटी परतावा 13.1 टक्क्यांनी वाढून 29,968 कोटी झाला.

आर्थिक वर्षाचे पहिले चार महिने सकारात्मक

एप्रिल ते जुलै 2026 या कालावधीत एकूण जीएसटी संकलन 10.1 टक्क्यांनी वाढून 8.43 लाख कोटी झाले, जे मागील वर्षी याच कालावधीत 7.66 लाख कोटी होते. निव्वळ जीएसटी महसूल 9.2 टक्क्यांनी वाढून 7.21 लाख कोटी झाला. यावरून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत कर संकलन मजबूत राहिल्याचे दिसून येते.

महाराष्ट्र, कर्नाटकची अव्वल कामगिरी

प्रमुख राज्यांमध्ये, महाराष्ट्राने जुलै महिन्यात 32,210 कोटींचा जीएसटी महसूल नोंदवला. हे संकलन मागील वर्षाच्या तुलनेत 13 टक्क्यांनी अधिक आहे. तर कर्नाटकमधील संकलन 12 टक्के वाढीसह 13,854 कोटी रुपये इतके झाले. गुजरातचे संकलन 19 टक्क्यांनी वाढून 12,923 कोटी रुपये झाले. हरियाणाने 11,892 कोटी रुपये जमा केला असून ही 25 टक्क्यांची प्रभावी वाढ आहे.  तेलंगणामध्ये 19 टक्के वाढीसह 5,819 कोटी रुपये आणि उत्तर प्रदेशमध्ये 15 टक्के वाढीसह 9,651 कोटी रुपये जीएसटी जमा झाला. या आकडेवारीत राज्यांनुसार काही घटही दिसून आली. मुख्यत्वे तामिळनाडूचा जीएसटी महसूल 1 टक्के, आंध्र प्रदेशचा 5 टक्के आणि मध्य प्रदेशचा 10 टक्क्यांनी घटला.

चालू आर्थिक वर्षातील महिनानिहाय संकलन

एप्रिल  2026                      2.42 लाख कोटी

मे  2026                         1.94 लाख कोटी

जून  2026                       1.94 लाख कोटी

जुलै  2026                      2.11 लाख कोटी

राज्यनिहाय   संकलन

महाराष्ट्र :    32,210 कोटी रु.

कर्नाटक   : 13,854 कोटी रु.

गुजरात :  12,923 कोटी रु.

हरियाणा : 11,892 कोटी रु.

उत्तर प्रदेश : 9,651 कोटी रु.

तेलंगणा : 5,819 कोटी रु

Advertisement
Tags :

.