‘जीएसटी’ सुधारणांचा प्रत्येक कुटुंबाला फायदा होईल : सीतारामन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जीएसटीच्या महत्त्वाच्या सुधारणांना ‘लोकांच्या सुधारणा’ म्हणत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सांगितले की, विविध उत्पादनांसाठीच्या दरांचे सुसूत्रीकरण केल्याने प्रत्येक कुटुंबाला फायदा होईल, वापर वाढेल आणि अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. खास मुलाखतीत अर्थमंत्र्यांनी सांगितले की, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दर कपातीचा लाभ किमती कमी होऊन लोकांना मिळण्याच्या दृष्टीने त्या स्वत: लक्ष ठेवतील. अशा कपातीबाबत उद्योगांनी सकारात्मकता दर्शविली आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.
निर्णयाच्या काही दिवसांतच कार उत्पादकांपासून ते सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या आणि शूज आणि कपड्यांच्या ब्रँड्सनी आधीच किमतीत लक्षणीय कपात करण्याची घोषणा केली आहे आणि नवीन जीएसटी दर लागू होईपर्यंत उर्वरित उत्पादनेही त्याचे अनुकरण करतील, असे त्या म्हणाल्या. 22 सप्टेंबर रोजी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जीएसटीमध्ये फेरबदल लागू होईल. त्यानंतर साबणापासून ते कार, शॅम्पूपासून ते ट्रॅक्टर आणि एअर कंडिशनरपर्यंत जवळजवळ 400 उत्पादने स्वस्त होतील. वैयक्तिक आरोग्य आणि आयुर्विम्यावर भरलेला प्रीमियम करमुक्त असेल. 40 टक्के दर हा काही छोट्या वस्तू आणि अतिऐषोरामी वस्तूंसाठी राखून ठेवण्यात आला आहे.
‘ही एक अशी सुधारणा आहे जी 140 कोटी लोकांच्या जीवनाला स्पर्श करते. या देशात अशी कोणतीही व्यक्ती नाही जी जीएसटीपासून दूर राहिली आहे. गरिबातील गरीब व्यक्तीलाही तो ज्या काही तरी लहान वस्तू खरेदी करतो त्यातून जीएसटीचा स्पर्श होतो, असे सीतारामन यांनी म्हटले आहे.