बजाज फायनान्सला जीएसटीची नोटीस
कंपनीच्या अडचणी वाढल्या : 341 कोटींच्या करचोरीप्रकरण : कंपनीकडून अद्याप उत्तर नाह
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जीएसटी विभागाने बजाज फायनान्सला 341 कोटी रुपयांच्या करचोरीप्रकरणी नोटीस पाठवली आहे. वित्तीय सेवा क्षेत्रात कार्यरत बजाज फायनान्सवर करचुकवेगिरीचा आरोप आहे. विमा कंपन्यांनंतर आता या कंपनीला जीएसटीने नोटीस पाठवली आहे. जीएसटी विभागाने बजाज फायनान्सला 341 कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे. ज्यामध्ये कर का भरलेला नाही अशी विचारणा केली आहे.
काय आहेत आरोप?
कंपनीने चुकीच्या पद्धतीने सेवा शुल्क व्याज आकार म्हणून दाखवले आहे. जेणेकरून त्यांचा कर वाचू शकेल. चौकशीत ही बाब समोर आल्यानंतर कंपनीविरुद्ध कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
कंपनीकडून प्रतिसाद नाही
या प्रकरणी कंपनीकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. बजाज फायनान्स ही देशातील सर्वात मोठी बिगर बँकिंग क्षेत्रातील वित्तसंस्था आहे. जीएसटी विभागाकडून अनेक कंपन्यांना थकबाकीच्या नोटिसा पाठवल्या जात आहेत. जीएसटी विभागाने सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या 20 सामान्य विमा कंपन्यांना जीएसटी नोटिसा पाठवल्या असल्याची माहिती आहे.
कधीचे प्रकरण?
हे प्रकरण जून 2022 ते मार्च 2024 या कालावधीतील संबंधित आहे. जीएसटी विभागाने 3 ऑगस्ट रोजी नोटीस जारी केली होती. याआधी जीएसटी विभागाकडून करचुकवेगिरीच्या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. करचुकवेगिरीत अडकल्यानंतर बजाज फायनान्सला ही नोटीस बजावण्यात आली आहे.