For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

ऑक्टोबरमध्ये जीएसटी 2.31 लाख कोटींच्या पार

06:59 AM Nov 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
ऑक्टोबरमध्ये जीएसटी 2 31 लाख कोटींच्या पार
Advertisement

मागील वर्षीच्या तुलनेत 22.9 टक्क्यांची लक्षणीय वाढ; आयात महसुलात 42 टक्के वाढ

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत सरकारचे ऑक्टोबरमधील एकूण वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन 2.31 लाख कोटींवर पोहोचल्याचे रविवारी जाहीर केले. हे संकलन गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 22.9 टक्क्यांनी वाढले आहे. ऑक्टोबरमध्ये सकल देशांतर्गत महसूल 15.8 टक्क्यांनी वाढून 1.59 लाख कोटी झाला, तर आयातीतून मिळणारा महसूल 42.2 टक्क्यांनी वाढून 72,246 कोटींवर पोहोचला.

Advertisement

चालू आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या सात महिन्यांसाठी (एप्रिल-ऑक्टोबर) एकूण जीएसटी संकलन 14.78 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. ही प्राप्ती गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 13.2 टक्क्यांनी अधिक आहे. ऑक्टोबरमधील एकूण जीएसटी संकलनामध्ये केंद्रीय जीएसटीचा (सीजीएसटी) वाटा 42,935 कोटी, राज्य जीएसटीचा (एसजीएसटी) वाटा 51,340 कोटी आणि एकात्मिक जीएसटीचा (आयजीएसटी) वाटा 1.37 लाख कोटींहून अधिक असल्याचेही रविवारी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे.

जीएसटी रिफंडमध्ये वाढ

जीएसटी रिफंडमध्येही वार्षिक तुलनेत 6.5 टक्क्यांनी वाढून 27,934 कोटींवर पोहोचला. परताव्यांची रक्कम समायोजित केल्यानंतर, ऑक्टोबरमधील निव्वळ जीएसटी संकलन 26 टक्क्यांनी वाढून 2.03 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले.

महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातची आघाडी कायम

प्रमुख राज्यांमध्ये महाराष्ट्राने ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक 35,150 कोटी रुपयांचा जीएसटी महसूल नोंदवला, जो मागील वर्षीच्या 31,013 कोटी रुपयांच्या तुलनेत 13 टक्क्यांनी वाढला आहे. त्यानंतर कर्नाटकचा क्रमांक लागतो. कर्नाटकात मागील वर्षीच्या तुलनेत 18 टक्के वाढीसह 15,922 कोटी रुपयांचे संकलन झाले  आहे. गुजरातचा जीएसटी महसूल 16 टक्क्यांनी वाढून 13,516 कोटी रुपये झाला. उत्तर प्रदेशचा जीएसटी महसूल 24 टक्क्यांनी वाढून 10,235 कोटी रुपये झाला. तसेच हरियाणाचे संकलन 17 टक्क्यांनी वाढून 11,529 कोटी रुपये झाले. तर दिल्लीत ते 10 टक्के वाढीसह 9,298 कोटींवर पोहोचले आहे. पंजाबचा जीएसटी महसूल 25 टक्क्यांनी 2,856 कोटींवर पोहोचला. मोठ्या राज्यांमध्ये आसाममध्ये सर्वाधिक वाढ नोंदवल्याचे निदर्शनास येत आहे. केरळचा जीएसटी महसूल 23 टक्क्यांनी वाढून 3,486 कोटींवर पोहोचला, तर पश्चिम बंगालचे संकलन 17 टक्क्यांनी वाढून 6,055 कोटींवर पोहोचले. ऑक्टोबर महिन्यात अनेक राज्यांमध्ये जीएसटी संकलनात घट झाली. सिक्कीममध्ये सर्वाधिक घट झाल्याने महसूल 28 टक्क्यांनी घसरून 221 कोटींवर आला. लडाखचे संकलन 20 टक्क्यांनी घसरून केवळ 63 कोटींवर आले.

Advertisement
Tags :

.