For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑगस्टमध्ये जीएसटी 2 लाख कोटी

07:05 AM Sep 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
ऑगस्टमध्ये जीएसटी 2 लाख कोटी
Advertisement

केंद्र सरकारची माहिती, सेवाक्षेत्राचा बोलबाला

Advertisement

सलग दुसऱ्या महिन्यात...

  • दोन लाख कोटी किंवा त्यापेक्षा अधिक करसंकलनाचा सलग दुसरा महिना
  • आर्थिक पाया मोठ्या प्रमाणात विस्तारल्याचे हे द्योतक, उत्पादनामध्येही वाढ
  • मोठ्या राज्यांप्रमाणे ईशान्य भारत आणि छोट्या राज्यांमध्येही संकलन वाढ
  • येत्या 12 सप्टेंबरला वस्तू-सेवा करमंडळाची, नवी दिल्ली येथे बैठक होणार

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

नुकत्याच संपलेल्या ऑगस्ट महिन्यात वस्तू-सेवा कराचे (जीएसटी) संकलन 2 लाख कोटी इतके झाले आहे. सेवाक्षेत्राच्या भरीव योगदानामुळे 2 लाख कोटीची मर्यादा गाठता आलेली आहे. ऑगस्ट 2025 च्या तुलनेत या ऑगस्टमध्ये हे संकलन 14.8 टक्के अधिक आहे. परतावा रकमेतही यावेळी वाढ झालेली आहे. वस्तू-सेवा करप्रणालीचा प्रारंभ 2017 मध्ये करण्यात आला. त्यानंतरच्या काळात आतापर्यंत सात महिन्यांमध्ये करसंकलन 2 लाख कोटी किंवा त्यापेक्षा अधिक झाले आहे. ऑगस्ट हा सलग दुसरा महिना आहे, ज्यात संकलन 2 लाख कोटी किंवा त्याच्यावर झाले आहे. यामुळे आता देशात कराचा पाया रुंदावला असल्याचे स्पष्ट होत आहे. देशात वस्तू उत्पादन वाढत असून गुंतवणुकीची मागणीही वर्धिष्णू आहे. खरेदी वाढल्याने वस्तू-सेवा करसंकलनातही वाढ झाली.

केंद्रीय करसंकलनातही वाढ

देशांतर्गत वस्तू-सेवा करसंकलनात 9.3 टक्के वाढ झाली असून ते 1.37 लाख कोटी रुपये इतके आहे. यात केंद्रीय कराचे प्रमाण 38 हजार 413 कोटी रुपये तर राज्य स्तरीय कराचे प्रमाण 46 हजार 316 कोटी रुपये आहे. तसेच संयुक्त करसंकलनाचे प्रमाण 52 हजार 520 कोटी रुपये आहे. आयात वस्तूंच्या माध्यमातून मिळणाऱ्या शुल्कातही वाढ झाली असून ती 29 टक्के आहे. तर संकलन 62 हजार 604 कोटी रुपयांचे झाले, अशी माहिती देण्यात आली आहे.

10 लाख कोटीहून अधिक

एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या काळात वस्तू-सेवा कराच्या माध्यमातून करसंकलन 10 लाख 43 हजार कोटी रुपये इतके झाले आहे. गेल्या वर्षीच्या याच कालखंडाच्या तुलनेत त्यात 11 टक्के वाढ झाली आहे. परतावा रकमेच्या प्रमाणात वाढ झालेली असूनही निव्वळ करसंकलन 9 टक्के अधिक झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि हरियाणा ही चार राज्ये वस्तू-सेवा करसंकलनात मोठ्या प्रमाणात आघाडीवर आहेत, अशीही माहिती देण्यात आली. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, आसाम, छत्तीसगड, लडाख आणि अंदमान-निकोबार बेटे यांच्या करसंकलनातही चांगल्यापैकी वाढ बघावयास मिळत आहे. त्यामुळे कराचा पाया विस्तारत असून ही करप्रणाली आता देशात चांगली रुळल्याचे दिसून येते. संकलन व्यवस्थाही उत्तम रितीने कार्यरत असल्याचे दिसते.

उद्योग क्षेत्रात समाधान

वस्तू-सेवा करसंकलनात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रत्येक महिन्यात ही वाढ महागाई दराच्या वाढीपेक्षा अधिक आहे. याचाच अर्थ, करसंकलनात खऱ्या अर्थाने वाढ (रियल ग्रोथ) होत असल्याचे दिसून येते. आर्थिक पाया विस्तारला गेल्याचा लाभ आगामी महिन्यांमध्येही होईल, अशी शक्यता आहे.

जीएसटी मंडळाची बैठक होणार

येत्या 12 सप्टेंबरला जीएसटी मंडळाची बैठक होणार आहे. अशी बैठक वर्षापेक्षा अधिक काळानंतर होणार आहे. या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री आणि राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री भाग घेतील, अशी अपेक्षा आहे. या बैठकीत आतापर्यंतच्या करसंकलनाचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच भविष्यकाळातील वाटचालीविषयीचे संकेत मिळतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.