जीएसएस कॉलेज-अरिहंत हॉस्पिटलमध्ये एमओयु करार
बेळगाव : जीएसएस कॉलेजच्या पीजी मायक्रोबायोलॉजी विभाग आणि अरिहंत हॉस्पिटल, दीक्षित हेल्थकेअर प्रा. लि. यांच्यात प्रशिक्षण, अध्यापन व संशोधनासाठी महत्त्वपूर्ण अशा सामंजस्य करारावर (श्दळ) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. अध्यक्षस्थानी हृदयरोगतज्ञ व अरिहंत हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. महादेव डी. दीक्षित होते. कार्यक्रमास एसकेईचे उपाध्यक्ष प्रा. एस. वाय. प्रभू, मायक्रोबायोलॉजी व इम्युनोलॉजी क्षेत्रातील तज्ञ किशोर भट, संस्थेचे व्यवस्थापन सदस्य श्रीनाथ देशपांडे, प्राचार्य प्रा. अभय सामंत हेही या बैठकीस उपस्थित होते. पीजी मायक्रोबायोलॉजी विभागाच्या अभ्यासक्रम समन्वयक प्रा. प्रियांका कुंडेकर यांचीही उपस्थिती होती. या कराराद्वारे विद्यार्थी प्रशिक्षण, क्लिनिकल एक्सपोजर,संयुक्त संशोधन प्रकल्प आणि अत्याधुनिक प्रयोगशाळा कौशल्यविकासाला नवे मार्ग खुले होणार आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. दोन्ही संस्थांच्या सहकार्यामुळे वैद्यकीय मायक्रोबायोलॉजी क्षेत्रात शैक्षणिक उत्कृष्टता साध्य होण्यास मदत होणार आहे.