गृहलक्ष्मी सहकारी संस्थांना लवकरच प्रारंभ
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर : महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी कर्ज
बेंगळूर : महिलांना बँकांकडून योग्य कर्जसुविधा मिळत नाही. परिणामी त्यांना स्वावलंबी जीवन जगणे कठीण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थ्यांच्या नावाने सहकारी संस्था सुरू करण्याची योजना आखली आहे. याद्वारे महिलांना कर्जसुविधा देऊन स्वावलंबी बनविले जाईल. याकरिता लवकरच गृहलक्ष्मी योजनेतील लाभार्थ्यांकरिता सहकारी संस्था सुरू केल्या जातील, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. म्हैसूर दसरोत्सवातील कार्यक्रम असलेल्या महिला दसरा महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. दसरा हा महिलांचा स्वाभिमान, समृद्धी, संयम आणि शक्तीचे प्रतीक आहे. दुष्टांविरुद्ध लढून नीतिमत्तेचे रक्षण करणाऱ्या देवीची आराधना म्हणजे विजयादशमी, असे वर्णन त्यांनी केले. आयसीडीएसच्या कक्षेत येणारी अंगणवाडी केंद्रे सुरू होऊन 50 वर्षे झाली आहेत. आता सुवर्णमहोत्सव कार्यक्रम करण्याचा विचार सुरू आहे. एलकेजी, युकेजी सुरू करून अंगणवाड्यांना आणखी एक पाऊल पुढे नेण्यात येत आहे, असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमप्रसंगी गॅरंटी योजना प्राधिकरणाच्या उपाध्यक्षा पुष्पा अमरनाथ, महिला दसरा समितीचे अध्यक्ष मल्लीगे वीरेश, महिला बालकल्याण खात्याचे संचालन महेश बाबू, महिला दसरा उपसमितीच्या विशेष अधिकारी सविता बी. एम. आदी उपस्थित होते.