प्रादेशिक सेनेच्या भरतीला वाढता प्रतिसाद
बेळगावमध्ये हजारोंच्या संख्येने तरुण दाखल
बेळगाव : प्रादेशिक सेनेच्यावतीने बेळगावमध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. 15 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या दरम्यान कॅम्प येथील राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या समोरील मैदानावर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आले असून त्यानुसार प्रत्येक राज्यातील उमेदवारांना संधी देण्यात येत आहे.
प्रादेशिक सेनेच्या टीए बटालियनतर्फे बेळगावमध्ये भरती घेण्यात येत आहे. टेरिटोरियल आर्मीतर्फे बेळगावसोबत कोल्हापूर, देवळाली व सिकंदराबाद अशा चार ठिकाणी एकाच वेळी भरती घेतली जात आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादरा-नगर हवेली, दीव-दमण, लक्षद्वीप, पुदुच्चेरी, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ या राज्यांसाठी भरती प्रक्रिया होत असल्याचे सदर्न कमांडने स्पष्ट केले आहे.
भरतीसाठी देशभरातील तरुण उमेदवार सध्या बेळगावमध्ये येत आहेत. काही स्वयंसेवी संस्थांच्यावतीने त्यांना रात्रीच्यावेळी अल्पोपाहार तसेच पाण्याच्या बाटल्यांचे वितरण केले जात आहे. बोचऱ्या थंडीतही उमेदवार कॅम्प परिसरातील मराठा लाईट इन्फंट्रीच्या रस्त्यांवर आसरा घेत आहेत. तर काही जण रेल्वेस्थानक, बसस्थानक येथेही रात्र घालवत असल्याचे दिसून येत आहे.