तुरुंगांमध्ये वाढता कट्टरवाद गंभीर आव्हान
गृह मंत्रालयाने राज्यांना लिहिले पत्र : आव्हानाला सामोरे जाण्यासाठी दिशानिर्देश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरातील तुरुंगांमध्ये वाढत्या कट्टरवादाला केंद्रीय गृहमंत्रालयाने गंभीर आव्हान मानले आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठविण्यात आले आहे. गृह मंत्रालयाकडून पाठविण्यात आलेल्या पत्रामध्ये तुरुंगांमधील कट्टरवादाचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक दिशानिर्देश देण्यात आले आहेत.
कट्टरवादाच्या या आव्हानाला तोंड देण्यासाठी आता गृह मंत्रालयाकडून जारी निर्देशांनुसारच कैद्यांचे स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. तसेच वेळोवेळी त्यांच्यावर नजरही ठेवली जाणार आहे. संशयास्पद हालचालींमध्ये सामील किंवा जोखीमयुक्त कैद्यांच्या विरोधात गृह मंत्रालयाच्या निर्देशांनुसार अधिक देखरेख ठेवण्यात येणार आहे. तुरुंगात वाढणारा कट्टरवाद हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी मोठा धोका ठरत असल्याचे गृह मंत्रालयाकडून म्हटले गेले आहे.
देखरेखीची कमतरता
प्रत्यक्षात तुरुंगात असलेला सामाजिक वेगळेपणा आणि देखरेखीच्या कमतरतेमुळे कट्टरवाद वाढण्याचा धोका असल्याचे मानले जात आहे. काही प्रकरणांमध्ये कैदी हे तुरुंग कर्मचारी, अन्य कैदी तसेच बाहेरील लोकांवर हल्ला करण्याचा कट रचतात, याला गंभीर आव्हान मानता गृह मंत्रालयाने आता निर्देश जारी केले आहेत. तसेच कट्टरवादी कैद्यांवर करडी नजर ठेवत त्यांना इतर कैद्यांना प्रभावित करण्यापासून रोखण्यात यावे, असे म्हटले गेले आहे.
तुरुंगातून सुटल्यावरही फॉलोअप
गृह मंत्रालयाच्या निर्देशांनुसार स्क्रीनिंगमध्ये मानसिक, सामाजिक आणि आरोग्य मूल्यांकनही सामील केले जाणार आहे. कट्टरवाद रोखण्यासाठी समुपदेशन, शिक्षण आणि पुनर्वसन कार्यक्रमावरही जोर देण्यात येणार आहे. याचबरोबर कैदी तुरुंगातून बाहेर पडल्यावरही समाजाशी पुन्हा जोडला जाण्यावरून फॉलोअप देखरेख व्यवस्थेच्या अंतर्गत ठेवला जाणार आहे. सुधारणात्मक उपाय आणि व्यवहार्य पुनर्वसनाद्वारे कट्टरवादी मानसिकतेला बदलले जाऊ शकते, असे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना जारी करण्यात आलेल्या दिशानिर्देशात म्हटले गेले आहे. तर गृह मंत्रालयाने कैद्यांना कट्टरवादात ओढले जाण्यापासून रोखण्यासाठी अनेक पावले उचलण्याची सूचना पत्राद्वारे केली आहे.
वेगळा तुरुंग स्थापन करा
कट्टरवादाच्या विचारसरणीचा प्रचार करू शकणाऱ्या आणि उच्च जोखीमयुक्त कैद्यांना सामान्य तुरुंगातील कैद्यांपासून वेगळे ठेवण्यात यावे. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश स्वत:च्या अधिकारक्षेत्रात एक स्वतंत्र उच्च सुरक्षाप्राप्त तुरुंग परिसर स्थापन करण्याचा विचार करू शकतात, जेथे कट्टरवादी कैदी, दहशतवाद्यांना वेगळे ठेवता येऊ शकेल. याच्या माध्यमातून इतर कैद्यांना प्रभावित करण्यापासून त्यांना रोखता येणार आहे. या कैद्यांना उत्पादक पद्धतीने संलग्न करण्यासाठी पुनर्वसन कार्यक्रम आणि अन्य प्रशिक्षण मॉड्यूल्सोबत अधिकारी हे कैदी आणि त्यांच्या कुटुंबीयांदरम्यान निरंतर संपर्काला चालना देऊ शकतात, याच्या माध्यमातून त्यांच्या भावनात्मक स्थिरतेला मजबूत करता येऊ शकते, असे दिशानिर्देशात म्हटले गेले आहे.
स्टाफ प्रशिक्षण अन् संवेदनशीलता
तुरुंग कर्मचाऱ्यांना कट्टरवादाचे प्रारंभिक संकेत ओळखण्यासाठी प्रशिक्षित केले जाणार आहे. याकरता कार्यशाळा आणि सिम्युलेशन अभ्यास आयोजित होतील. तसेच एसओपी देखील तयार करण्यात येणार आहे. तर कैद्यांना मानसिक आरोग्य सल्लामसलत, कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी, धार्मिक विद्वानांशी संवाद, समाजसेवकांशी संपर्क आणि व्यावसायिक प्रशिक्षणाशी जोडले जाईल. याचा उद्देश कैद्यांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवून आणणे असेल.