ग्रो कंपनीचा येणार आयपीओ
मुंबई:
स्टॉक ब्रोकिंग प्लॅटफॉर्म ग्रो आपला आयपीओ बाजारात आणण्याची तयारी करते आहे. सदरच्या आयपीओच्या माध्यमातून 5800 कोटी रुपये उभारण्याची योजना कंपनीने आखली आहे. या आयपीओसाठी कंपनीने सिंगापूरमधील सॉवरेन वेल्थ फंड जीआयसी आणि सध्याचे गुंतवणूकदार टायगर ग्लोबल यांच्याशी चर्चा सुरु केली असल्याचे सांगितले जात आहे. आयपीओ यशस्वीपणे राबविला गेल्यास बेंगळूरमधील या स्टार्टअप कंपनीचे मूल्य 54 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. 2021 मध्ये पाहता ग्रोचे मूल्य 3अब्ज डॉलर इतके होते.
कधी झाली स्थापना
9 वर्षापूर्वी ललित केशरे, हर्ष जैन, ईशान बन्सल आणि निरीज सिंह यांनी एकत्रित येऊन ग्रो स्टार्टअपची सुरुवात केली होती. सुरुवातीला म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून कंपनी कार्यरत होती. आज देशातील सर्वात मोठी स्टॉक ब्रोकर कंपनी बनली आहे. पुढील काही महिन्यांमध्ये आयपीओसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कंपनी दाखल करू शकते.
कोणाकडे किती ग्राहक
यायोगे बाजारात प्रवेश करत ग्रो ही कंपनी जेरोधा आणि एंजलवन यांना थेटपणे टक्कर देणार आहे. फेब्रुवारीमध्ये ग्रोचे 1.3 कोटी ग्राहक होते. जेरोधाकडे 80 लाख आणि एंजलवनकडे 77 लाख ग्राहक आहेत. ग्रो या कंपनीने 2024 या आर्थिक वर्षात 3145 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला होता.