For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव जिल्ह्यात भूजल पातळी खालावली

10:32 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव जिल्ह्यात भूजल पातळी खालावली
Advertisement

पाणी समस्या गंभीर : नदी, तलाव, कूपनलिकांच्या पाणी पातळीत घट

Advertisement

बेळगाव : वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे भूगर्भातील पाणी पातळीत झपाट्याने घट होऊ लागली आहे. त्यामुळे पाणीप्रश्न गंभीर बनू लागला आहे. शहरासह 99 गावांना दैनंदिन टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असली तरी दुसरीकडे जलसंकट गंभीर बनले आहे. जलाशय, तलाव, विहिरी आणि कूपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे. विशेषत: 600 ते 700 फूट जमीन खोदून देखील पाणी मिळणे अशक्य होऊ लागले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र बनू लागली आहे. वळिवाच्या पावसाने देखील काही भागात हुलकावणी दिली आहे. त्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट बनू लागली आहे. गतवर्षी केवळ 40 टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे हिडकल, नविलतीर्थ आणि राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीत घट झाली आहे. त्यामुळे शहरात 8 ते 10 दिवसाआड पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे. मार्च महिन्यापासून जिल्ह्यातील दीडशेहून अधिक तलाव आणि विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्याचबरोबर जलाशयातून पाणी न सोडल्याने नद्याही कोरड्या पडत आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर शेती आणि पशूधनासाठी पाण्याचा प्रश्न चिंतेचा विषय ठरू लागला आहे.

मागील चार वर्षांपासून पावसाअभावी भूगर्भातील पाण्याची पातळी कमालीची खाली गेली आहे. काही ठिकाणी 1200 फूट जमीन खोदून देखील पाणी मिळेनासे झाले आहे. शेकडो गावातील पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत्र विहिरी आणि कूपनलिका आहेत. मात्र विहिरी आणि कूपनलिकाही पाण्याविना बंद पडू लागल्या आहेत. काही ठिकाणी कूपनलिका भाड्याने घेऊन पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी पातळी खालावल्याने पाणी समस्येवर मात करण्यासाठी नवीन कूपनलिका आणि विहिरींची खोदाई होऊ लागली आहे. मात्र, अपेक्षेप्रमाणे पाणी मिळत नसल्याने आर्थिक फटकाही बसू लागला आहे. भूगर्भातील पाणी पातळी घटल्याने पाण्याचा दर्जाही खराब झाला आहे. जिल्ह्यातील 450 गावांमध्ये 24 तास पाणीपुरवठ्यासाठी जलजीवन मिशन योजना राबविण्यात आली आहे. मात्र पाणीच नसल्याने ही योजनाही बारगळली आहे. शहरासह ग्रामीण भागातील जनता घटप्रभा, मलप्रभा, हिरण्यकेशी आणि कृष्णा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र नद्यांचीही पाणी पातळी खाली आल्याने सर्वत्र पाणी समस्या गंभीर बनू लागली आहे. जिल्ह्यात विविध गावांमध्ये 1200 हून अधिक जलशुद्धीकरण केंद्रे आहेत. मात्र पाण्याअभावी ही केंद्रे देखील कूचकामी ठरू लागली आहेत. विशेषत: बेळगाव आणि चिकोडी विभागातील 430 हून अधिक जलशुद्धीकरण केंद्रे पाण्याविना बंद पडली आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.