बालविवाह केल्याप्रकरणी नवरदेवाला अटक; विवाहाला संमती देणाऱ्या दोन्ही बाजूंच्या पालकांवरही गुन्हा दाखल
कुरुंदवाड : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याप्रकरणी नवरदेवाला कुरुंदवाड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बिरू तपन्ना बेळगे (वय २६, रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले) असे अटक करण्यात आलेल्या नवरदेवाचे नाव आहे. याप्रकरणी विवाहाला संमती देऊन बालविवाह घडवून आणल्याप्रकरणी दोन्ही बाजूंच्या पालकांवरही गुन्हा दाखल कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कुरुंदवाड पोलिसातून मिळालेली माहिती बिरू तपन्ना बेळगे याचा विवाह एका अल्पवयीन मुलीशी ठरवण्यात आला होता. मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक असतानाही, नियमांची पायमल्ली करत अल्पवयीन असलेल्या या मुलीचा हा बालविवाह पार पाडण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत बिरू तपन्ना बेळगेला पोलिसांनी अटक केली आहे.
बालविवाह हा कायद्याने गंभीर आणि दखलपात्र अपराध आहे. अल्पवयीन मुला-मुलींचे लग्न लावून देणाऱ्यांवर, लग्नाला उपस्थित राहणाऱ्यांवर आणि सहकार्य करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल कुमार डोईजड यांनी दिला आहे.