For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापुरात पुन्हा किराणा दुकान फोडले

01:16 PM Nov 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
खानापुरात पुन्हा किराणा दुकान फोडले
Advertisement

दोन लाखाचे किराणा साहित्य लंपास : पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान

Advertisement

खानापूर : शहरासह तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून अवघ्या पंधरा दिवसांत आठ घरे, एक मंदिर आणि बुधवारी मध्यरात्री करंबळ क्रॉस येथील किराणा दुकानाचा पत्रा कापून चोरट्यांनी जवळपास 2 लाखाचे किराणा साहित्य लंपास केले आहे. चोरट्यांनी चोरी करून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे रिसीव्हर घेऊन पलायन केल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून चोरट्यांनी तालुक्यात अक्षरश: थैमान घातले आहे. चोरट्यांना पोलिसांची भीतीच राहिली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांतून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मंगळवारी मध्यरात्री खानापूर शहरातील मेदार लक्ष्मी मंदिरात मोठ्या प्रमाणात चोरी झाली होती. पुन्हा बुधवारी मध्यरात्री करंबळ क्रॉस येथील बाळू बरगावकर यांच्या माउली सुपर मार्केट या दुकानात मागील बाजूचा पत्रा कापून चोरी केली आहे. यात चोरट्यांनी 21 पोती तांदूळ, 21 डब्बे सूर्यफूल तेलाचे डबे, 10 किलो खारीक, 10 किलो बदाम, खोबरे एक पोते, तिखट, खोबरेल तेल यासह इतर वस्तू लांबविल्या आहेत. जवळपास 1 लाख 90 हजारचा माल चोरट्यांनी लांबविला असल्याचे दुकानमालकांनी सांगितले. तसेच चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे रिसीव्हरच पळवलेले आहे. त्यामुळे नियोजनबद्ध चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

माउली सुपर मार्केट हे दुकान नव्याने तयार झालेल्या महामार्गालगत नंदगड रस्त्यावर आहे. या भागात अलीकडे मोठ्या प्रमाणात दुकाने उभारण्यात आली आहेत. या दुकानाच्या मागील बाजूने महामार्गाचा सर्व्हिस रस्ता जातो. तर समोरील बाजूने नंदगड रस्ता आहे. या दोन्ही रस्त्यावर रात्री प्रकाश व्यवस्था आहे. असे असताना चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा एक माणूस प्रवेश करेल असा कटरने कापून दुकानात प्रवेश करून चोरी करण्यात आली. इतके साहित्य नेण्यासाठी माल वाहतूक करणारे वाहन वापरण्यात आल्याचा संशय दुकान मालकाने व्यक्त केला आहे. नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले असता चोरी झाल्याचे लक्षात येताच याची माहिती खानापूर पोलिसांना देण्यात आली. खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक लालसाब गवंडी, गुन्हे विभागाचे निरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला.

पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीबाबत प्रश्नचिन्ह

गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यात चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याने पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान निर्माण झाले आहे. चोरट्यासमोर पोलीस हतबल झाल्याचे दिसून येत आहे. चोरट्यांना पोलिसांची भीतीच नसल्याचे चोरींच्या सुरू असलेल्या मालिकेवरून दिसून येत आहे. महामार्गावर रात्री पेट्रोलियम करण्यासाठी पोलिसांची नियुक्ती करण्यात येते. मात्र पोलिसांकडून रात्रीची गस्त घालण्यात येते की नाही, यावर नागरिकांतून प्रश्नचिन्ह उभारले जात आहे.

Advertisement
Tags :

.