For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गृहज्योती पुनर्तपासणीला सर्व्हर डाऊनमुळे विलंब

07:40 AM Jul 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
गृहज्योती पुनर्तपासणीला सर्व्हर डाऊनमुळे विलंब
Advertisement

नागरिकांसह कर्मचाऱ्यांनाही मनस्ताप

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव

Advertisement

गृहज्योती योजनेसाठी सुरू असलेल्या पुनर्तपासणीला सर्व्हर डाऊनचा फटका बसत आहे. शहरासह ग्रामीण भागात सर्व्हर नसल्याने नागरिकांना तासन् तास वाट पहावी लागत आहे. यामुळे कर्मचारीही वैतागले असून सर्व्हर डाऊनची समस्या दूर करण्याची मागणी होत आहे. यामुळे अतिशय कमी प्रमाणात पुनर्तपासणी होत असल्याचे दिसून येत आहे.

राज्य सरकारच्या पंचहमी योजनेतील गृहज्योती या योजनेसाठी सध्या हेस्कॉमकडून पुनर्तपासणीचे काम सुरू आहे. गरजू लाभार्थ्यांनाच गृहज्योतीचा लाभ मिळावा, या उद्देशाने पुनर्तपासणी केली जात आहे. यासाठी ग्राहकाकडून आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, रेशनकार्ड, फोटो याची मागणी केली जात आहे. पुनर्नोंदणी झाल्यानंतरच यापुढे गृहज्योती योजनेचा लाभ मिळणार आहे.

नोकरदार ग्राहकांची संख्या अधिक असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेळेत ते उपलब्ध होत नाहीत. यासाठीच गल्लीतील एखाद्या घरी, मंदिरात अथवा समुदाय भवनामध्ये पुनर्तपासणीचे काम केले जात आहे. परंतु सकाळपासून दुपारपर्यंत सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण होत आहे. राज्यात एकाचवेळी तपासणीचे काम सुरू असल्याने ही समस्या उद्भवत आहे. यामुळे नागरिक तसेच तपासणी करणाऱ्या व्यक्तीचाही वेळ वाया जात आहे. त्यामुळे दिवसभरात मोजक्याच व्यक्तींच्या पुनर्तपासणीचे काम होत आहे.

सर्व्हर डाऊनची समस्या सध्या कमी

संपूर्ण राज्यात एकाचवेळी गृहज्योती पुनर्तपासणीचे काम सुरू असल्यामुळे सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण होत आहे. सुरुवातीला ती अधिक प्रमाणात होती. सध्या मात्र सर्व्हर डाऊन कमी प्रमाणात होत आहे. त्यातही दुपारनंतर कर्मचारी पुनर्तपासणीसाठी घरोघरी जात आहेत. काही ठिकाणी रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत पुनर्तपासणीचे काम केले जात असल्याने नागरिकांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे.

- अरविंद गदगकर (कार्यकारी अभियंता शहर)

Advertisement

.