16 जानेवारीला झळकणार ‘गृह लक्ष्मी’
हिना खान मुख्य भूमिकेत
अभिनेत्री हिना खान सध्या कॅन्सरवरील उपचार करवून घेत आहे. या गंभीर आजाराला सामोरे जात असतानाही तिने काम करणे थांबविलेले नाही. अभिनेत्रीची आगामी वेबसीरिज ‘गृह लक्ष्मी’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये अभिनेत्री एका शूर महिलेची भूमिका साकारताना दिसून येते.
जेव्हा एक महिला सूड उगवू पाहते, तेव्हा ती सर्वकाही नष्ट करू शकते अशा आशयाचा संवाद तिच्या तोंडी आहे. ट्रेलरमध्ये मोलकरीण ते राणी होण्यापर्यंतचा क्रूर प्रवास दाखविण्यात आला आहे. हिनाची ही थ्रिलर सीरिज 16 जानेवारी रोजी ‘एपिक ऑन’वर स्ट्रीम होणार आहे.
गृह लक्ष्मी या सीरिजमध्ये हिनासोबत अनेक दिग्गज कलाकार सामील आहेत. चंकी पांडे, राहुल देव आणि दिव्येंदु भट्टाचार्य यात प्रमुख भूमिकेत आहेत. या सीरिजमध्ये हिना खानचा वेगळा अवतार दिसून येणार आहे. ती पहिल्यांदाच अॅक्शन करताना दिसून येईल. हिनाचे चाहते तिचा हा नवा अवतार पाहण्यासाठी आतुर आहेत.