गृहज्योती योजनेला 5 ऑगस्ट रोजी चालना
ऊर्जामंत्री के. जे. जॉर्ज यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर प्रत्येक घराला 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा करण्यात आली होती. या योजनेला 5 ऑगस्ट रोजी चालना देण्यात येणार आहे, अशी माहिती ऊर्जा मंत्री के. जे. जॉर्ज यांनी दिली.
बेंगळूरमध्ये रविवारी पत्रकारांशी ते बोलत होते. जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळणार आहे. 5 ऑगस्ट रोजी या योजनेला चालना दिली जाणार आहे. आतापर्यंत 1 कोटी 40 लाख कुटुंबांनी गृहज्योती योजनेसाठी अर्ज दाखल केले आहेत. अजूनही अर्ज दाखल होत आहेत. मात्र, काही ठिकाणी सर्व्हर डाऊनची समस्या असल्याने नोंदणी प्रक्रिया संथगतीने होत आहे, असे त्यांनी सांगितले.
गृहज्योती नोंदणीसाठी अंतिम मुदत नाही. तरी देखील ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात येणारे जुलै महिन्यातील वीज बिल शून्य येण्यासाठी अगोदर नोंदणी करावी लागेल. तत्पूर्वी नोंदणी न केल्यास नेहमीप्रमाणे वीज बिल येणार आहे, अशी माहितीही जॉर्ज यांनी दिली.