भाजप नेत्याच्या घरावर ग्रेनेड हल्ला
पंजाबमधील धक्कादायक प्रकार
वृत्तसंस्था/ जालंधर
पंजाबच्या जालंधरमध्ये भाजप नेते मनोरंजन कालिया यांच्या निवास्थानी विस्फोट झाला आहे. स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेत चौकशी सुरू केली. तर स्फोटाच्या घटनेवेळी माजी मंत्री कालिया हे कुटुंबीयांसह घरातच होते. सोमवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला.
सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका आरोपीने ई-रिक्षातून उतरत हँडग्रेनेडचा लीवर काढून तो कालिया यांच्या घरात फेकल्याचे समोर आले. तर ग्रेनेडच्या स्फोटामुळे कालिया यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. रात्री सुमारे एक वाजता स्फोटाच्या घटनेची माहिती मिळाली, ज्यानंतर घटनास्थळी जात आम्ही तपास सुरू केल्याचे जालंधरच्या पोलीस आयुक्त धनप्रीत कौर यांनी सांगितले आहे.
स्फोट मनोरंजन कालिया यांच्या घरात झाला आहे. पंजाबचे माजी मंत्री आणि भाजप नेते मनोरंजन कालिया यांना राज्य सरकारकडून 4 सुरक्षारक्षक प्रदान करण्यात आले आहेत. कालिया यांची सुरक्षेचा प्रभार असलेला अधिकारी त्यांच्याच निवासस्थानात राहत असल्याची माहिती जालंधरचे पोलीस उपायुक्त मनप्रीत सिंह यांनी दिली आहे.
लॉरेन्स बिश्नोईचा हात
कालिया यांच्या निवासस्थानी झालेल्या ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. पंजाबमध्ये अशाप्रकारची कृत्यं लॉरेन्स बिश्नोई पाकिस्तानच्या मदतीने करतोय हे सत्य आहे. लॉरेन्स बिश्नोईला अहमदाबादच्या साबरमती तुरुगांत केंद्र सरकारकडून सुरक्षा दिली जात आहे. लॉरेन्सचे पाकिस्तानी हस्तकांशी संबंध असल्याचे कुणापासून लपून राहिले नसल्याचा दावा पंजाबचे मंत्री मोहिंदर भगत यांनी केला आहे.