काश्मीरमध्ये भर बाजारात ग्रेनेड हल्ला
सीआरपीएफ बंकरजवळ स्फोट, 12 जण जखमी : गर्दीच्या ठिकाणी घातपात घडवून हाहाकार माजविण्याचे कारस्थान
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी मोठा ग्रेनेड हल्ला झाला. ऑल इंडिया रेडिओ स्टेशनच्या बाहेर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) बंकरवर हा हल्ला करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, या हल्ल्यात किमान 12 नागरिक जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर काश्मीर पोलिसांचे विशेष कृती दल तपासासाठी तैनात करण्यात आले आहे. तसेच हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलीस आणि निमलष्करी दल घटनास्थळी पाठवण्यात आले आहे.
श्रीनगरच्या लाल चौकात दर रविवारी आठवडी बाजार भरतो. या बाजाराच्या निमित्ताने परिसरात गर्दी झालेली असतानाच दहशतवाद्यांनी हा ग्रेनेड हल्ला करत हाहाकार माजवण्याचा प्रयत्न केला. हल्ला झालेल्या परिसरात पर्यटक रिसेप्शन सेंटर (टीआरसी) देखील होते. या केंद्राजवळ ग्रेनेड फेकण्यात आला. ग्रेनेडचा स्फोट झाल्यानंतर परिसरात घबराट पसरली आणि गर्दीतील लोक जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धावू लागले.
ग्रेनेड हल्ल्यात जखमी झालेल्यांना तात्काळ श्री महाराजा हरिसिंह ऊग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये आठ पुऊष आणि एका महिलेचा समावेश असून सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तसनीम शौकत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांचा इशारा
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ग्रेनेड हल्ल्यावर चिंता व्यक्त केली. त्यांनी हल्ल्याचा निषेध करत ही घटना अत्यंत संतापजनक असल्याचे म्हटले आहे. ‘गेल्या काही दिवसांपासून खोऱ्यातील काही भागात हल्ले आणि चकमकीच्या बातम्या चर्चेत आहेत. श्रीनगरच्या रविवारच्या बाजारात निष्पाप ग्राहकांवर ग्रेनेड हल्ला झाल्याची आजची बातमी अतिशय अस्वस्थ करणारी आहे. निरपराध नागरिकांना लक्ष्य करण्याचे कोणतेही समर्थन होऊ शकत नाही. सुरक्षा यंत्रणांनी हल्ल्याची ही लाट लवकरात लवकर थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत जेणेकऊन लोक कोणत्याही भीतीशिवाय आपले जीवन जगू शकतील,’ असे ट्विट मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे.
अनंतनाग-खानयारमध्ये चकमक
ग्रेनेड हल्ल्याच्या एक दिवस आधी, शनिवारी, श्रीनगरच्या अनंतनाग आणि खानयारमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली, ज्यामध्ये तीन दहशतवादी ठार झाले. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा (एलईटी) चा एक वरिष्ठ कमांडर होता. काश्मीरमध्ये मोठा घातपात घडवण्यासाठी या भागातील एका घरात हे दहशतवादी लपून बसले होते. दहशतवाद्यांनी आश्रय घेतलेले घर सुरक्षा दलांनी पेटवून दिले आहे.