For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हुतात्मा दिनानिमित्त उद्या अभिवादन

11:16 AM Jan 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
हुतात्मा दिनानिमित्त उद्या अभिवादन
Advertisement

मूकफेरीत सहभागी होण्याचे आवाहन

Advertisement

बेळगाव : सीमालढ्याच्या आंदोलनामध्ये अनेक मराठी भाषिकांनी आपल्या जीवाचे रान करून सीमाप्रश्न धगधगता ठेवला. यामध्ये अनेकांना हौतात्म्य आले तर अनेकांनी कारागृहामध्ये शेवटचा श्वास घेतला. या सर्व हुतात्म्यांचे बलिदान आजच्या पिढीला समजावे, यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने प्रतिवर्षी 17 जानेवारी रोजी संपूर्ण सीमाभागात हुतात्मा दिन पाळला जातो. यावर्षी बुधवार दि. 17 रोजी हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी 9.30 वाजता हुतात्मा चौक येथे अभिवादन करून त्यानंतर मूकफेरी काढली जाणार आहे. हुतात्मा मारुती बेन्नाळकर, मधू बांदेकर, महादेव बारागडी, लक्ष्मण गावडे, कमळाबाई मोहिते यांना आदरांजली वाहिली जाणार आहे. याबरोबरच 8 फेब्रुवारी 1969 रोजी शिवसेनेने 68 हुतात्मे दिले. 1 जून 1986 रोजी कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात 9 हुतात्मे झाले. या सर्वांना हुतात्मादिनी अभिवादन केले जाणार आहे.

1956 मध्ये केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचना केली. त्यापूर्वी बेळगावसह संपूर्ण सीमाभाग तत्कालिन मुंबई प्रांतामध्ये होता. परंतु, कोणताही विचार न करता केंद्र सरकारने हा मराठी भाषिक भाग म्हैसूर प्रांताला जोडला. कानडी प्रांताला मराठी भूभाग जोडल्याने मराठी भाषिकांमध्ये तीव्र असंतोष होता. पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या गोळीबारामध्ये अनेक सीमावासीय हुतात्मे झाले. तर अनेक जण वर्षानुवर्षे कारागृहात राहिल्याने तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीमाप्रश्नासाठी हौतात्म्य पत्करलेल्यांना अभिवादन केले जाते. त्यानंतर बेळगाव शहरातून मूकफेरी काढली जाते. रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, अनसूरकर गल्ली, रामलिंग खिंड गल्ली, किर्लोस्कर रोड येथून पुन्हा हुतात्मा चौक अशी पारंपरिक मार्गाने मूकफेरी काढली जाते. यावेळी सीमावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Advertisement

सीमालढ्यावरील आधारित व्यंगचित्रांचे प्रदर्शन

सीमालढ्यावरील आधारित व्यंगचित्रांचे प्रदर्शन दि. 17 ते 20 जानेवारीपर्यंत भरविण्यात येणार आहे. खानापूर रोड येथील मराठा मंदिर येथे हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. सीमावासियांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.