बाळासाहेब ठाकरेंच्या कल्पवृक्षरुपी जीवंत स्मारकाला अभिवादन
सावंतवाडीतील जुन्या शिवसैनिकांकडून जयंतीनिमित्त अनोखी श्रद्धांजली
सावंतवाडी । प्रतिनिधी
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर आणि जुने शिवसैनिक यांनी कुणकेरी पाळणेकोंड धरण येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कल्पवृक्ष रुपी जीवंत स्मारकाला अभिवादन केले. यावेळी, शिवसेनेच्या परंपरेनुसार, बाळासाहेबांच्या कार्याला श्रद्धांजली अर्पण करत, त्यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी जुन्या शिवसैनिकांनी पाच नवीन कल्पवृक्षांची लागवड केली आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला उजाळा दिला.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त, पाळणेकोंड धरण येथील जीवंत स्मारकाला अभिवादन करण्यासाठी जुने शिवसैनिक एकत्र झाले. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पुष्पहार अर्पण करुन जिवंत स्मारकाला श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी, साळगावकर यांनी जणू बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांचा आदर्श सध्याच्या पिढीला सांगितला.स्मारकाच्या जागेवर नळपाणी योजनेच्या कामामुळे काही बदल होणार असल्याने, नव्या जागेत पाच नवीन कल्पवृक्षांची लागवड करून स्मारकाचे पुनर्जीवन करण्यात आले . या कल्पवृक्षांचे प्रतीक म्हणजे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याची आणि योगदानाची जिवंत निशाणी. यावेळी बाळासाहेबांच्या कार्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्व शिवसैनिक एकत्र आले होते.या प्रसंगी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचे महत्त्व सांगत, त्यांच्या विचारधारेचा ठसा संपूर्ण महाराष्ट्रावर कसा राहिला, याबाबत भाष्य केले. त्यांनी सांगितले, “स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे २०१७ मध्ये हे जीवंत स्मारक उभारले. त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेने गावागावात संघटना पोहोचवली आणि सामान्य माणसाला नेतृत्व करण्याची संधी दिली. बाळासाहेबांनी लोकांच्या हाती सत्ता देऊन प्रस्थापितांपेक्षा सामान्य माणसाला महत्त्व दिले."साळगावकर यांनी सांगितले, “स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व फक्त शब्दांत नाही, तर कृतीतून होते. त्यांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान वागणूक दिली आणि त्यांना धाडस देऊन हिंदुत्वाचा पाठपुरावा करण्यासाठी प्रेरित केले. बाळासाहेबांच्या नेतृत्वामुळेच अनेक नेत्यांना राज्यात महत्त्व मिळाले."यावेळी बबन साळगावकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या दृष्टिकोनावरही विचार मांडले. "बाळासाहेबांनी हिंदुत्वाची शिकवण दिली आणि त्यानुसारच त्यांनी विविध धर्मीयतेसहित समाजातील विविध घटकांचे स्वागत केले. त्यांच्यात धर्माचा द्वेष कधीही नव्हता. ते अब्दुल कलाम यांचा आदर करत, हिंदू-मुस्लिम एकतेवर विश्वास ठेवत." असे साळगावकर यांनी सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उमेश कोरगावकर, उमाकांत वारंग, विलास जाधव, सुरेश भोगटे, गणपत बांदेकर, दीपक सावंत, रत्नाकर माळी, बंड्या तोरसेकर, प्रसाद कुडतरकर, महेश नार्वेकर, संदीप नाईक यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. याशिवाय, पाणी पुरवठा अधिकारी भाऊ भिसे आणि उद्यान पर्यवेक्षक गजानन परब आदी उपस्थित होते .