For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव विभागात वाढणार हिरवळ

11:16 AM Jun 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव विभागात वाढणार हिरवळ
Advertisement

15 लाख रोपांची लागवड : वन खात्याची धडपड, 500 हेक्टरात उद्दिष्ट

Advertisement

बेळगाव : झाडांच्या संख्येत वाढ व्हावी आणि पर्यावरणाचा समतोल राखावा, यासाठी वनविभागामार्फत वृक्ष लागवडीवर भर दिला जात आहे. यंदाच्या हंगामात बेळगाव आणि गोकाक विभागात 15 लाख रोप लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जवळजवळ 500 हेक्टरात ही लागवड केली जाणार आहे. यासाठी रोप वितरणाचे कार्य सुरू झाले आहे. सामाजिक वनीकरण विभागामार्फत नरेगा योजनेंतर्गत खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये रोप लागवडीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्याबरोबर शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, खुल्या जागा, सरकारी जागा आदी ठिकाणी रोप लागवडीला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे बेळगाव आणि गोकाक विभागात हिरवळ दिसणार आहे. यामध्ये चंदन, आंबा, बांबू, अंजिर, जांभूळ, सीताफळ, सफरचंद, फणस यासह 60 हून अधिक प्रजातीच्या रोपांचा समावेश आहे. विशेषत: वनविभागाच्या नर्सरीमध्ये रोपे तयार करण्यात आली आहेत. मच्छे येथील नर्सरीतून 1.6 लाख, शिरुर नर्सरीतून 91 हजार, हिडकल 1.20 लाख, सावरगाळी 1.20 लाख, कणकुंबी 1.21 लाख, लोंढा 1.22 लाख, गोल्याळी 1.29 लाख, नागरगाळी 1.50 लाख अशी बेळगाव विभागातील नर्सरीतून एकूण 12.95 लाख रोपे लागवड केली जाणार आहेत. त्याबरोबर गोकाक विभागातील नर्सरीतून 3 लाख रोपांची लागवड होणार आहे. यंदा हवामान खात्याने समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे रोपांची जोमाने वाढ होईल, अशी आशा ठेवली आहे.

रोपे वाढविण्यासाठी प्रोत्साहन

Advertisement

वनीकरण योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी विविध रोपांची लागवड व संवर्धन केल्यास त्यांना प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे. या योजनेंतर्गत चंदन, काजू, सागवान, कापूस, आदी रोपांचे वितरण होणार आहे. रोपांच्या आकारमानानुसार तीन ते तेवीस रुपयांपर्यंत किंमत आहे. शेतकऱ्यांनी जमिनीत रोपे लागवड करून त्याचे संगोपन केल्यास वनविभागाकडून तीन वर्षांच्या कालावधीसाठी प्रति रोपासाठी 125 रुपये प्रोत्साहन धन दिले जाणार आहे. सात-बारा उतारा, आधारकार्ड व दोन छायाचित्रांसह वनखात्याकडे संपर्क साधावा.

प्रत्येकाने एखादे झाड लावा 

बेळगाव आणि गोकाक विभागात 15 लाख रोप लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकरी आणि विविध संस्थांना विविध योजनेंतर्गत वनीकरण कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. प्रत्येकाने एखादे झाड लावावे. पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी प्रत्येकाची आहे.

एस. के. कल्लोळीकर-उपवनसंरक्षाधिकारी

Advertisement
Tags :

.