सोलापूर - मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा
व्हायबिलिटी गॅप फंडिंगला मंत्रिमंडळाची मंजुरी; आमदार देवेंद्र कोठे व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याला यश
सोलापूर :
दीर्घ प्रतीक्षेनंतर सोलापूर - मुंबई विमानसेवा सुरू होण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सोलापूर - पुणे - मुंबई विमानसेवेसाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग (VGF) मंजूर करण्यात आले आहे. या निर्णयामुळे विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला असून, शहराच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. अनेक वर्षांपासून सोलापूरकर आणि उद्योजक सोलापूरहून मुंबई, बेंगळुरू, दिल्लीसारख्या शहरांना थेट विमानसेवेची मागणी करत होते. मात्र सेवेअभावी उद्योग आणि रोजगाराच्या संधी अडथळ्यात येत होत्या.
या पार्श्वभूमीवर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीही केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन हा मुद्दा मांडला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोलापूर दौऱ्यात विमानतळावर झालेल्या चर्चेत हा विषय पुन्हा चर्चेत आला आणि त्यानंतर राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतला. या निर्णयामुळे सोलापूर - मुंबई - सोलापूर विमानसेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
- काय आहे व्हायबिलिटी गॅप फंडिंग (VGF)?
विमानसेवा कमी प्रवाशांमुळे तोट्यात जाऊ नये म्हणून, राज्य सरकारने प्रति तिकिट एक ठराविक रक्कम विमान कंपनीला भरपाई स्वरूपात देण्याची योजना तयार केली आहे. यालाच व्हायबिलिटी गॅप फंडिंग म्हणतात. यामुळे विमानसेवा टिकवून ठेवण्यास मदत होते.
"गेल्या अनेक दशकांपासून विकासापासून वंचित राहिलेलं सोलापूर आता उद्योगजगतात वेगाने उभं राहील. विमानसेवेच्या निर्णयामुळे सोलापूरातील उच्चशिक्षित तरुणांचे स्थलांतर थांबेल आणि शहरात रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सोलापूरकरांतर्फे आभार."
- देवेंद्र कोठे, आमदार, सोलापूर शहर मध्य