'ग्लास हाऊस' ला फुटली हिरवी पालवी !
कोल्हापूर / सुधाकर काशीद :
कोल्हापुरात एक उद्यान आहे. 1874 सालचे. म्हणजेच दीडशे वर्षाचे. ब्रिटीश अधिकाऱ्यांनी या बागेत अगदी हेरून-हेरून अशी औषधी गुणधर्माची झाडे लावली. शहराच्या मध्यवस्तीत टाऊन हॉल म्हणजे ऑक्सिजन पार्कच उभा केला. या बागेला 150 वर्षे झाली आहेत. शतकोत्तर सुवर्ण महोत्सव म्हणजे उद्यानाचा दीडशेवा वाढदिवस आहे आणि या निमित्ताने प्रत्येक झाडाची तर देखभाल आहेच, पण या उद्यानातील ब्रिटीशकालीन ग्लास हाऊसचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. नव्या ढंगात शनिवारी, 5 एप्रिलला हे ग्लास हाऊस कोल्हापूरकरांसाठी खुले होणार आहे.
ब्रिटीश अधिकाऱ्यांनी टाऊन हॉल 1870 ते 1876 या काळात उभा केला. शंभर-दोनशे दुर्मिळ झाडांनी या ग्रीन हाऊसमध्ये चांगले बाळसे धरले. पण काळाच्या ओघात त्याच्याकडे दुर्लक्ष होत गेले. ग्लास हाऊसच्या काचा फुटल्यप्, तुटल्या. त्यातील झाडे वाळून गेली. एक भंगार आयुष्य जगण्याची वेळ ग्लास हाऊसवर आली. पण आता या उद्यानात खूप प्रयत्नाने पुन्हा ग्लास हाऊस उभे राहिले आहे आणि कोल्हापूरचे हिरवेगार वैभव पुन्हा तरारू लागले आहे.
टाऊन हॉल हे स्थान 1874 च्या काळात फक्त जे ब्रिटिश अधिकारी व त्यांचे कुटुंबीय कोल्हापुरात रहात होते, त्यांच्या सोयीसाठी ते बांधले होते. 80 प्रकारची देशी-विदेशी झाडे तेथे लावली. ही सर्व झाडे आरोग्याच्या दृष्टीने खूप उपयोगी पडणारीही होती. हे हिरवेगार उद्यान म्हणजे कोल्हापूरच्या मध्यवर्ती ठिकाणाचे ऑक्सिजन पार्कच ठरले होते. पण काळाच्या ओघात इतक्या पर्यावरणपूरक उद्यानाची देखभाल म्हणावी तशी राहिली नाही. उद्यानाचे अनेक कर्मचारी निवृत्त झाले. पण त्यांच्या जागी नवे कोणी भरलेच नाही. अर्थात त्याचा परिणाम उद्यानाच्या हिरव्यागार ऐश्वर्यावर झाला.
या उद्यानात गांजा माव्याचे व्यसनी लोक बसू लागले आणि हळूहळू त्यांचा अड्डाच या उद्यानात तयार झाला .त्यामुळे चांगले नागरिक या बागेत फिरायला येणेच बंद झाले. बागेचा एक कोपरा जणू गांजा पिणाऱ्यांसाठी राखीवच राहिला. येथील अधिकारी कर्मचारी त्यांच्या ताकतीनुसार प्रयत्न करायचे. पण दहशतीमुळे गप्प बसायला लागायचे. त्यामुळे टाऊन हॉलवर अशा विचित्र माणसांचा ताबा राहिला. गोंधळलेले, आजारी माणूस, सिक आजारी असलेले लोकच उद्यानात सावलीखाली कायम झोपताना दिसत राहिले.
कोल्हापूरकरांनाही या उद्यानाबद्दल त्यामुळे फारशी आस्था राहिले नाही. पण या उद्यानात उद्यान अधीक्षक म्हणून रावळ साहेब आणि आता जयवेंद्र पानसरे आले आणि उद्यानाचे अक्षरश: रुपडेच बदलले. येथील झाडांचे जतन करणाऱ्या ग्लास हाऊसचे रूप बदलले. इनडोअर रोपांची रांग ग्लास हाऊसमध्ये दिसू लागली, ग्लास हाऊसमुळे पानांना उन्हाची हळ कमी बसू लागली. ग्लास हाऊसमध्ये लोखंडी खांब पुन्हा उभे करण्यात आले आणि कोवळ्या हिरव्यागार पाना-फुलांनी ग्लास हाऊसला एक वेगळीच किनार लागली. आता नूतनीकरण केलेल्या या ग्लास हाऊसचा उद्घाटन सोहळा शनिवारी 5 एप्रिलला होणार आहे. टाऊन हॉलच्या आठ एकरात पाने, फुले, फळे आणि वनस्पतीचा खजिनाच भरून गेला आहे. कोल्हापूरकरांनी पहिल्यांदा आपला टाऊन हॉल विविध अंगाने पाहणे गरजेचे आहे. पिकते तेथे विकत नाही, असा एक वाक्यप्रचार या उद्यानाला जोडला गेला आहे. टाऊन हॉलचे हे वैभव वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी उद्यान विभाग आणि आपल्या कोल्हापूरकरांच्यावरच आहे.
- वटवाघळांची कॉलनी..
या उद्यानात वटवाघळांचे मोठ्या संख्येने वास्तव्य आहे. चिरोपटेरा या प्रवर्गातील ही वटवाघळे आहेत. मधील चार झाडांवर वटवाघळांची कॉलनीच आहे. रोज सूर्य मावळतीला गेला की वटवाघळांचे थवे बाहेर पडतात. अगदी शाहूवाडी, आंबापर्यंत जाऊन पुन्हा पहाटे टाऊन हॉलमध्ये ती येतात. काही वर्षापूर्वीपर्यंत या उद्यानामध्ये वटवाघळांची शिकार होत होती, वटवाघळांचे रक्त गुडघेदुखी, सांधेदुखीसाठी औषध आहे, असे सांगितले जात होते. आता टाऊन हॉल चांगलेच अॅक्टिव्ह होत आहे. वटवाघळांची शिकार करणाऱ्यांचा वावर थांबला आहे.
- 150 वर्षांपूर्वीचे उद्यान
टाऊन हॉलमधील ग्लास हाऊस 150 वर्षांचे आहे. पण ते गंजून गेले होते. या बागेत नियुक्त केलेल्या काही अधिकाऱ्यांनी उद्यानाच्या सद्यस्थितीबद्दल कधी चिंताच केली नाही. त्यामुळे हे उद्यान तसे काळ्या यादीत गेले होते, पण आता पुन्हा नवे तेज घेऊन ते उभे राहिले आहे.