ग्रिव्हजच्या नाबाद अर्धशतकाने विंडीजला सावरले
दुसरी कसोटी विंडीज प. डाव 5 बाद 239
► वृत्तसंस्था, पोर्ट ऑफ स्पेन
जस्टिन ग्रिव्हजचे नाबाद अर्धशतक तसेच चेस समवेत नोंदविलेल्या अभेद्य 66 धावांच्या भागिदारीच्या जोरावर येथे सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटीत खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर यजमान विंडीजने पहिल्या डावात 5 बाद 239 धावा जमविल्या. ग्रिव्हज 64 तर चेस 36 धावांवर खेळत आहेत. पाकतर्फे मोहम्मद अलीने 50 धावांत 2 गडी बाद केले.
आयसीसी विश्वकसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत सुरू असलेल्या या कसोटी मालिकेतील पहिली कसोटी विंडीजने यापूर्वीच जिंकून आघाडी मिळविली आहे. या दुसऱ्या कसोटीतील खेळाच्या पहिल्या दिवशी पावसाचा अडथळा आल्याने सुमारे 15 षटकांचा खेळ वाया गेला. या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
सलामीचा फलंदाज ब्रेंडॉन किंगने संघाच्या डावाला दमदार सुरुवात करून दिली. त्याने 50 चेंडूत 9 चौकारांसह 46 धावा जमविताना चंद्रपॉल समवेत सलामीच्या गड्यासाठी 49 धावांची भागिदारी केली. पावसामुळे खेळाच्या पहिल्या सत्रात केवळ 9.5 षटकांचा खेळ झाला आणि विंडीजने 1 बाद 49 धावा जमविल्या होत्या. किंग 33 धावांवर खेळत होता. या सत्रामध्ये पाकच्या मोहम्मद अलीने चंद्रपॉलला झेलबाद केले. त्याने 32 चेंडूत 2 चौकारांसह 15 धावा जमविल्या.
खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ढगाळ वातावरणात पाकच्या वेगवान गोलंदाजीसमोर विंडीजच्या फलंदाजीची सत्वपरीक्षा ठरली. पंचांनी हे खेळाचे दुसरे सत्र निर्धारीवेळेपेक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला. या सत्रामध्ये विंडीजने आणखी 3 गडी गमविताना 116 धावांची भर घातली. चहापानावेळी विंडीजने पहिल्या डावात 47 षटकांत 4 बाद 165 धावांपर्यंत मजल मारली होती. हॉप 29 तर ग्रिव्हज 27 धावांवर खेळत होते.
या सत्रामध्ये पाकच्या अली उस्मानने ब्रेंडॉन किंगला पायचीत केले. त्याने 50 चेंडूत 9 चौकारांसह 46 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजचा केविन हॉज साजीद खानच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 44 चेंडूत 10 धावा जमविल्या. उबेद शहाने अमिर जंगूला रिझवानकरवी झेलबाद केले. त्याने 55 चेंडूत 3 चौकारांसह 26 धावा जमविल्या. या सामन्यात पाकच्या उबेद शहाने आपले कसोटी पदार्पण केले. हॉप आणि ग्रिव्हज यांनी पाचव्या गड्यासाठी 53 धावांची भागिदारी केली.
खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये विंडीजने केवळ 1 गडी गमविताना 75 धावांची भग घातली. या कालावधीत ग्रिव्हजने 92 चेंडूत 7 चौकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले तर ग्रिव्हज आणि चेस या जोडीने अर्धशतकी भागिदारी 110 चेंडूत नोंदविली. मोहम्मद अलीने हॉपचा त्रिफळा उडविला. त्याने 68 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 29 धावा जमविल्या. त्यानंतर मात्र पाकच्या गोलंदाजांना शेवटपर्यंत यश मिळाले नाही. दिवसअखेर ग्रिव्हज 127 चेंडूत 8 चौकारांसह 65 तर चेस 72 चेंडूत 5 चौकारांसह 36 धावांवर खेळत असून या जोडीने सहाव्या गड्यासाठी अभेद्य 67 धावांची भागिदारी केली आहे. पाकतर्फे मोहम्मद अलीने 2 तर उबेद शहा, अली उस्मान आणि साजीद खान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या दुसऱ्या कसोटीसाठी विंडीज संघाने पहिल्या कसोटीत विजय मिळविलेल्या चमूमध्ये कोणताही बदल केला नाही. मात्र पाक संघात अब्बासला विश्रांती देऊन शहाला संधी देण्यात आली. या कसोटीत सलामीचा शान मसूद दुखापतीमुळे खेळू न शकल्याने अब्दुल्ला शफीकला खेळविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक: विंडीज प. डाव 74.4 षटकांत 5 बाद 239 (ग्रिव्हज खेळत आहे 65, चेस खेळत आहे 36, हॉप 29, जंगू 26, हॉज 10, चंद्रपॉल 15, किंग 46, अवांतर 13, मोहम्मद अली 2-50, उबेद शहा, अली उस्मान, साजीद खान प्रत्येकी 1 बळी).