सत्संगतीचे महात्म्य
अध्याय तिसरा
बाप्पा म्हणाले, सत्संगाचे महत्त्व फार आहे. सत्संगती म्हणून मनुष्य धर्मग्रंथ वाचतो, कथाकीर्तन ऐकायला जातो, धार्मिक व्रतवैकल्ये करतो, कुलधर्म कुलाचार पार पाडतो पण त्याला त्याचा म्हणावा तसा लाभ मिळत नाही. याचं कारण म्हणजे हे सर्व त्यानं यांत्रिक पद्धतीने पार पाडलेलं असतं किंवा करायचं म्हणून केलेलं असतं. त्यात त्याचा मनापासून सहभाग नसतो. लोक साधुसंत मंडळींचं दर्शन घेतात, आदरभाव दाखवतात पण दैनंदिन व्यवहारात त्यांची शिकवण अमलात न आणता स्वत:चा स्वार्थ कशात आहे हे पाहून त्याप्रमाणे वागतात. साधूंजवळ माणसांना आवडणारे विषय किंवा वैषयीक भोगवस्तू मिळत नसल्याने लोक त्यांच्या सहवासात राहायला तयार नसतात. संतसंग त्यागल्यामुळे त्यांना आपलं भलं कशात आहे, कायम टिकणारा आनंद कसा मिळवायचा व समाधानात जीवन कसं व्यतीत करायचं इत्यादि आध्यात्मिक बाबी त्यांना उमगतच नाहीत. त्यामुळे ते पापपुण्याच्या बंधनात अडकतात.
सत्संगापासून सर्वांना सद्गुणांची प्राप्ती, आपत्तींचा नाश आणि इहलोकी व परलोकी स्वहित प्राप्त होते ह्या अर्थाचा सत्संगाद्गुणसंभूतिरापदां लय एव च । स्वहितं प्राप्यते सर्वैरिह लोके परत्र च ।। 42।। हा श्लोक आपण पहात आहोत. बहुतेक मंडळी संतसंग तोंडी लावण्यापूरता करून पुन्हा ऐहिक विषयातली गोडी चाखण्यात मग्न होतात पण त्यामुळे त्यांचं अपरिमित म्हणजे मोजता न येण्यासारखं नुकसान होतं. विशेष म्हणजे हे बिचाऱ्यांच्या लक्षातच येत नाही. सत्संगतीमुळे मनुष्याला गुण प्राप्त होतात. त्यानुसार वर्तन केल्यामुळे व्यवहारातील आपत्तींचा नाश होऊन येथील जीवन हिताचे होते व परलोकातही सुख मिळते. थोडक्यात इह-परलोकात आपला उध्दार करून घेण्यासाठी संत संग करावा असा उपदेश बाप्पा करत आहेत.
संतसंग करायचा म्हणजे संतांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागायचं. त्यासाठी वेद उपनिषदावर आधारित असलेल्या त्यांच्या ग्रंथांचा अभ्यास करावा. त्यामध्ये व्यवहारिक जगात कोणत्या प्रसंगी कसं वागायचं याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलेलं असतं. तसं करताना काहीवेळा आपण करतोय ते बरोबर का चूक हा विचार मनात आल्यास तो झटकून टाकायचा आणि पुढं जायचं कारण संत हे ईश्वराचं सगुण रूप असल्याने ते सांगतात ते पूर्णपणे बरोबर आणि आपल्या हिताचे असतं. त्यामुळे त्यानुसार वागणं आपल्या भल्याचं आहे अशी खात्री बाळगावी. जीवनात येणारे प्रसंग आपल्या हातात नसतात परंतु त्या त्या प्रसंगी कसं वागायचं ह्याचं स्वातंत्र्य देवाने आपल्याला दिलेलं आहे हे लक्षात घेऊन कठीण प्रसंगी कसं वागलं म्हणजे ते अचूक ठरेल ते संत आपल्याला सांगतात. आपण योजलंय तसं घडेल की नाही याबद्दल आपल्याला सदैव चिंता लागून राहिलेली असते. संत आपल्याला चिंतामुक्त करतात. ते सांगतात, आयुष्याचा जीवनक्रम पूर्वनियोजित असून तो आपल्या हिताचा असतो. म्हणून काळजी करायचं एकदम बंद करा. काल काय घडलंय त्यावर विचार करू नका. उद्या काय होईल म्हणून काळजी करू नका. सदैव ईश्वर स्मरणात राहा, नितीन्यायानुसार वागा. जे घडेल ते हिताचं आहे अशी खात्री बाळगा. आत्ता या क्षणी घडलेली गोष्ट कदाचित आवडणारी नसेल तरी कालांतराने घडलेली गोष्टच हिताची आहे हे लक्षात येते. म्हणून कधीही सत्संग सोडू नका. श्रीगोंदवलेकर महाराज याबाबतीत फार मार्मिक उदाहरण देतात. ते म्हणतात रेल्वेत बसलेले, अगदी बिन तिकिटाचे, भिकारीसुद्धा शेवटपर्यंत जातात, फक्त त्यांनी रेल्वे सोडायची नाही. तसेच आपण संकटाच्या किंवा विपरीत परिस्थितीत संतांच्या उपदेशानुसार वागल्यास आपलं भलं निश्चित होणार आहे ही खात्री बाळगावी, त्यानुसार वर्तन करावे.
क्रमश: