बाईक रॅलीला उत्तम प्रतिसाद
सुळेभावी श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त आयोजन
बेळगाव : सुळेभावी (ता. बेळगाव) येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रा 18 ते 26 मार्चपर्यंत होणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी सुळेभावी ते बेळगावपर्यंत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला पंचक्रोशीतील भाविकांनी उत्तम प्रतिसाद दिला. महालक्ष्मी देवीचे विशेष पूजन करून रविवारी सकाळी बाईक रॅलीला चालना देण्यात आली. गावातील प्रमुख मार्गांवरून जाऊन खणगाव बी. के., अष्टे, कणबर्गीमार्गे ही रॅली बेळगावला पोहोचली. चन्नम्मा सर्कल, धर्मवीर संभाजी महाराज चौकापर्यंत जाऊन त्याच मार्गाने गांधीनगर, सांबरामार्गे ही रॅली सुळेभावीला पोहोचली. श्री महालक्ष्मी देवस्थान जीर्णोद्धार कमिटीचे चेअरमन देवण्णा बंगेन्नवर म्हणाले, प्रत्येक पाच वर्षांतून एकदा देवीची यात्रा भरते. यात्रेला मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. यात्रेच्या जागृतीसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बसनगौडा हुंकरी पाटील म्हणाले, यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावात सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून भाविकांसाठी पायाभूत सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.