ब्रिटनमध्ये आज भव्य राज्याभिषेक सोहळा
सोहळ्याची तयारी पूर्ण, आज संपूर्ण जगाच्या नजरा लंडनवर
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनचे राजे चार्ल्स आणि राणी पॅमिला यांचा राज्याभिषेक सोहळा शनिवार, 6 मे रोजी वेस्टमिन्स्टर अॅबे येथे होणार आहे. बकिंगहॅम पॅलेसमध्ये सध्या सोहळ्याची धामधूम सुरू असून तयारी पूर्ण झाली आहे. या राज्याभिषेकासाठी देश-विदेशातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याने आज संपूर्ण जगाच्या नजरा लंडनवर राहणार आहेत.
राज्याभिषेक सोहळ्यानंतर चार्ल्स अधिकृतपणे ब्रिटनचे राजा होणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10:20 वाजता राजमिरवणुकीने होईल. वेस्टमिन्स्टर अॅबे येथे 6 मे रोजी होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी देश-विदेशातील सुमारे दोन ते अडीच हजार विशेष मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच राजघराण्याचे चाहते जगभरातून प्रवास करत लंडनला पोहोचले आहेत. यामध्ये कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फ्रान्ससह अनेक देशांतून येणाऱ्या लोकांचा समावेश आहे. तथापि, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. त्यांनी राजा चार्ल्स यांना फोन करून याबाबत माहिती दिली. त्यांच्या जागी फर्स्ट लेडी जिल बायडेन अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणार आहेत. फोनवर झालेल्या चर्चेत बायडेन यांनी राजा चार्ल्स यांना सोहळ्यानंतर मुद्दामहून भेटण्याचा शब्द दिला आहे.
राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सकाळी 10:20 वाजता बकिंगहॅम पॅलेस ते वेस्टमिन्स्टर अॅबे असा दोन किलोमीटरचा प्रवास करून मध्य लंडनमध्ये राजाची मिरवणूक काढली जाईल. या मिरवणुकीत सशस्त्र दलाचे सुमारे 200 सदस्य सहभागी होणार आहेत. दुपारी 12:00 वाजता चार्ल्स-पॅमिला यांचा राज्याभिषेक होईल. पॅमिलाला क्वीन कॉन्सोर्टचा ‘रॉड विथ डव्ह’ (राजदंड) सादर केला जाईल. परदेशी नेते आणि राजघराण्यापासून ते निवडून आलेले अधिकारी आणि नागरी समाजाचे प्रतिनिधी असे सुमारे 2,300 मान्यवर याप्रसंगी उपस्थित असतील. समारंभात राजासाठी ‘गॉड सेव्ह द किंग’ हे गाणे गायले जाईल. चर्च ऑफ इंग्लंडमध्ये जस्टिन वेल्बी यांच्या नेतृत्वाखाली दुपारी 1:00 वाजता हा सोहळा समाप्त होईल. त्यानंतर सम्राट सिंहासनावर आरूढ होतील. त्यानंतर राजवाड्यात त्यांचे पारंपरिक रिवाजानुसार भव्य स्वागत केले जाणार आहे. चार्ल्स-पॅमिला यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे विशेष म्हणजे 1601 पासून आतापर्यंत मे महिन्यात फक्त एकदाच एखाद्या राजाचा राज्याभिषेक होत आहे.