महाअरिष्ट आणि विकास
देशाच्या पातळीवर तसेच राज्यस्तरावर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट दिसत आहे. युक्रेन-रशिया तसेच इस्रायल-इराक यांच्या युद्धातून तेल संकट निर्माण झाले. याचबरोबर व्यापार साखळी खंडित झाली. या युद्ध संकटाबरोबरच भारतात मान्सून पुरेशा प्रमाणात सक्रिय न झाल्याने पर्जन्य तुटीचे प्रमाण राष्ट्रीय स्तरावर 12.6 टक्के तर महाराष्ट्राच्या पातळीवर 19 टक्के इतके झाले. जेव्हा 20 टक्केपेक्षा अधिक पर्जन्य तूट असते तेव्हा आपण दुष्काळाकडे वाटचाल करत असतो. महाराष्ट्रात 40 टक्के प्रदेश दुष्काळ प्रवण असून पावसाचे असमान वितरण हा प्रश्न अधिक गंभीर करतात.
आगामी वर्षात देखील एल निनो प्रभाव असणार आहे. यातून शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उत्पादन घट होण्याची शक्यता दिसते. यातूनच ऊर्जा संकटाबरोबर किंवा तेल संकटाबरोबर आता अन्नसंकट आपल्या दारात उभे आहे. अन्न संकटाचे स्वरूप बहुविध असून त्यामध्ये अन्नधान्याची उपलब्धता कमी होणे, पौष्टिक अन्नधान्य उपलब्ध न होणे, अन्नधान्याच्या किमती वाढणे असे अनेक घटक दिसतात. शेतीचे मान्सूनवरील अवलंबन कमी, पर्जन्यातून येणारा दुष्काळ आणि त्यासोबत आंतरराष्ट्रीय स्तरावरून मिळणारी विविध प्रकारची खते यातून शेती उत्पादन मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहे. खतांच्याबाबतीत आपले अवलंबन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरवठा साखळी बिघडल्याने पुरेशा प्रमाणात आपणास खतांची उपलब्धता कमी होते. इंधनाच्या किमतीतील वाढ खतांची टंचाई आणि अन्नधान्य उत्पादनात होणारी घट या सर्व संकटावर राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या कर्जात होत असलेली वाढ हे वित्तीय संकट मोठे आहे. संकट एकटे येत नसते याचा पुरेसा अनुभव आपण घेत आहोत.
कौटिल्य परिषद आणि विकासाचा आशावाद
3 ते 5 ऑक्टोबर दरम्यान पाचवी कौटिल्य परिषद दिल्ली येथे पार पडली. यामध्ये 180 तज्ञांनी आगामी विकासाची दिशा याबाबत चर्चा केली. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी age of flux प्रचंड अस्थिरतेचा किंवा बदलाच्या कालखंडात आपण आहोत व याही परिस्थितीत भारत आपली सक्षमता व विविध आर्थिक धक्के पचवण्याची क्षमता सिद्ध करत असल्याचे सांगितले. त्यामुळे भारताचा विकास दर 2026-27 च्या पहिल्या तिमाहित 7.8 टक्के इतका साध्य करता आला. यातला महत्त्वाचा धक्का तेल किमतीचा होता पण त्याही बाबतीत योग्य नियोजन आणि धोरण यातून तेलाच्या किमती नियंत्रणात ठेवून अर्थव्यवस्था गतिमान ठेवता आली. पण याचबरोबर जागतिक स्तरावर ट्रम्प यांच्या धोरण धक्यातून आपली अर्थव्यवस्था सावरली आहे. अर्थव्यवस्थेची भविष्यकालीन धक्के सहन करण्याची क्षमतादेखील आपण निर्माण केली असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय अर्थव्यवस्था गतिमान राहू शकली व विकासाचा चांगला दर साध्य करू शकलो. यामध्ये आर्थिक विकासाचा समावेशक पाया उभा करण्यात आलेले यश हे महत्त्वाचे कारण होते. जनधन योजना मदतीचे प्रत्यक्ष खात्यावर हस्तांतरण यातून खऱ्या गरजूपर्यंत सरकार पोहोचू शकले. उज्वला गरीब कल्याण अन्न योजना यातून जागतिक स्तरावरील आर्थिक धक्के सर्वसामान्यांना कमीत कमी पोहोचतील अशी धोरण यंत्रणा राबवण्यात आली. जागतिक स्तरावर कर्जबाजारीपणा वाढत आहे. सध्या जगाचे कर्ज उत्पन्नाच्या 84 टक्के इतके झाले असून 2030 पर्यंत ते शंभर टक्केपेक्षा अधिक होणे शक्य आहे. अशा पार्श्वभूमीवर भारताचे मात्र कर्ज राष्ट्रीय उत्पन्नाच्या 82 टक्के होते, ते आता 76 टक्केपर्यंत नियंत्रित केले आहे. राजकोषीय तूट कमी करणे सोबत उत्पादन वाढीसाठी आवश्यक ती प्रोत्साहने दिली आहेत. परकीय चलन साठा देखील आता 766 बिलियन डॉलर्स एवढा आहे आणि व्यापार तूट ही चालू खात्याच्या वरील अर्धा टक्के इतकीच आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रातील “कोषपूर्वा सर्व आरंभा?” हा विचार अत्यंत समर्पक आहे. राज्याच्या सर्व मोठ्या उपक्रमांच्या मागे सक्षम कोष असणे आवश्यक आहे. संकटाच्या काळात सरकारला अर्थव्यवस्था आधार देण्यासाठी वित्तीय क्षमता हवी असते. त्यासाठी मेड इन इंडिया याच्यापुढे जाऊन भारतात परिकल्पित व तयार केलेला imagined and made in India यावर भर दिला जाणार आहे. यासाठी एक लाख कोटींची तरतूद करण्यात आली असून खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले जात आहे.
कप्तानाची परीक्षा
खवळलेला समुद्र, प्रचंड वारे अशा परिस्थितीत आपली नौका व्यवस्थित येणे हे कुशल कप्तानाचे वैशिष्ट्या असते. आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून भारतातील विकासाच्या चित्राकडे अद्यापही संशयाने पाहिले जाते. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून भारतीय बाजारपेठ आकर्षक नसल्याने मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक बाहेर जात आहे. रोजगाराच्या संधी मर्यादित होत असल्याने बाजारपेठेचा खरा ग्राहक बाहेर फेकला जात आहे. राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ या एकाच निकषावर विकास न पाहता सर्वसामान्य माणूस अधिक सुखी झाला का हा महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो. शिक्षण, आरोग्य, अंतर्गत शांतता व सुव्यवस्था या सर्वच निकषावर वस्तुस्थिती ही अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या अत्यंत गुलाबी चित्रापेक्षा खूप वेगळी आहे. संकटाच्या काळातही उत्पादन वाढीचा वेग सातत्यपूर्ण ठेवणे हे यश निश्चितच महत्त्वाचे आहे पण त्याचबरोबर विकासाचा पाया व्यापक असणे आवश्यक आहे. आर्थिक आपत्तीच्या काळात फक्त मोजक्या संस्था आणि व्यक्ती यांचे उत्पन्न वाढून एकूण उत्पन्न झपाट्याने वाढत आहे असे दिसत असले तरी प्रत्यक्षात प्रश्नांची गुंतागुंत वाढत आहे. दुष्काळासोबत आता महागाई देखील वाढू लागली आहे. आर्थिक आपत्तीच्या कालखंडात अधिक व्यापक आणि समावेशक धोरण आवश्यक ठरते. सरकारच्या दृष्टीने उअ वाढ, परकीय चलनसाठा, वित्तीय स्थैर्य आणि महागाई नियंत्रण ही निश्चितच सकारात्मक चिन्हे आहेत. परंतु विकासाचा खरा प्रश्न उअ किती वाढला हा नसून त्या विकासाचा लाभ कोणाला मिळाला हा आहे. रोजगाराची गुणवत्ता, ग्रामीण उत्पन्न, शेतकऱ्यांचे उत्पन्न, शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षा, अन्नाची परवडणारी किंमत आणि मध्यमवर्गाची खरेदीक्षमता या सर्वांचा विकासाच्या चर्चेत समान समावेश असणे आवश्यक आहे. विकासाचा लाभ मोजक्या क्षेत्रांमध्ये किंवा मोजक्या कंपन्या-व्यक्तींमध्ये केंद्रित राहिला आणि व्यापक लोकसंख्येची क्रयशक्ती वाढली नाही, तर जीडीपी वाढ असूनही अर्थव्यवस्थेतील अंतर्गत ताण वाढू शकतो. त्यामुळे समावेशक विकास हा केवळ सामाजिक न्यायाचा मुद्दा नसून आर्थिक स्थैर्याचाही मुद्दा आहे
महाअरिष्टातून विकास मार्ग
आजची परिस्थिती ‘एक संकट एक उपाय’ अशी राहिलेली नाही. हवामान, पाणी, शेती, ऊर्जा, अन्न, खत, रोजगार, व्यापार आणि सार्वजनिक वित्त हे परस्पर जोडलेले आहेत. त्यामुळे पुढील धोरणांचा केंद्रबिंदू Resilience लवचिकता आणि धक्के सहन करण्याची क्षमता हा असला पाहिजे. जलसंधारण आणि सूक्ष्म सिंचन, हवामान-स्मार्ट शेती, पिकांचे विविधीकरण, स्थानिक खतनिर्मिती, ऊर्जा स्रोतांचे विविधीकरण, अन्नधान्यांचे बफर स्टॉक, पुरवठा-साखळीचे विकेंद्रीकरण, ग्रामीण रोजगार, कौशल्यविकास आणि संशोधनामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करावी लागेल. आज भारतासमोर विरोधाभास उभा आहे. एका बाजूला जगातील अस्थिरतेतही भारताने काही महत्त्वाचे आर्थिक बफर्स उभे केले आहेत; दुसऱ्या बाजूला हवामान, अन्न, रोजगार आणि विषमतेची आव्हाने अजूनही गंभीर आहेत.
-डॉ. विजय ककडे
