Sangli News : तासगावात बागायती क्षेत्र वाढल्याने चराऊ कुरणे गायब
तासगावात बागायती वाढीमुळे चराऊ कुरणांची गंभीर हानी
तासगाव : ग्रामीण भागातील विकासाच्या पटावर गेल्या काही वर्षांत बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. उस, द्राक्षे, केळी, डाळिंब, भाजीपाला यांसारख्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने शेतीचे प्रमाण निश्चितच वाढले. पण याच वाढत्या बागायतीमुळे गावोगावी चराऊ कुरणांची मोठ्या प्रमाणात घट होत असून पशुधनासाठी चारा उपलब्धतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पूर्वी गावाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात पडीत जमीन व नैसर्गिक कुरणे उपलब्ध होती. गुरेढोरे, मेंढ्या, शेळ्यांचा कळप दिवसभर मुक्तपणे चरत असे. मात्र अलीकडच्या काळात सिंचनाच्या सुविधा वाढल्या, विहिरी व बोअरची संख्या वाढली व शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कोरडवाहू जमीन बागायतीत बदलवली. यामुळे नैसर्गिक कुरणांचा डास झाला आणिअनेक ठिकाणी तर 'गावठाण कुरण' पूर्णपणे नष्ट झाले आहेत. कुरणे नष्ट झाल्याने जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता घटली आहे. आधी दिवसभर मोकळ्या कुरणाबर चरणारी गुरे आता गोठ्यापुरतीच मर्यादित झाली आहेत. शेतकऱ्यांना बाहेरील चाऱ्यावर अवलंबून राहावेलागत असून त्यामुळे पशुपालनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लहान शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी आर्थिक समस्या बनली आहे.
गावरान मेंढपाळी, चराई व कळप पद्धतीचे व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग होते. कुरणे आटल्याने मेंढपाळांना कळप ठेवणे कठीण झाले आहे. कळपासाठी दिवसेंदिवस नवीन जागा शोधावी लागते आणि त्यामुळे अनेकांनी हा व्यवसाय सोडून मजुरीकडे किंवा पर्यायी रोजगाराकडे वळण्यास सुरुवात केली आहे.चराऊ कुरणे ही फक्त जनावरांसाठीची जमीन नसून पर्यावरणीय संतुलनासाठी अत्यंत महत्वाची जागा आहे. पश्नी, कीटक, लहान प्राणी यांचे नैसर्गिक अधिवास, पावसाच्या पाण्याची जमिनीत जिरवण क्षमता जैवविविधता टिकविण्यातीलयोगदान, कुरणे नाहीशी झाल्यामुळे हा समतोल ढासळत चालला आहे. चराऊ कुरणे पुन्हा टिकवावीत यासाठी गाव पातळीवर नियोजन करणे अत्यावश्यक आहे.
गावठाण कुरणांचे संरक्षण पडीत जमिनींचा योग्य वापर, वेगळे क्षेत्र राखून ठेवणे वनविभाग, महसूल, पंचायत राज विभाग यांच्या संयुक्त माध्यमातून चराऊ कुरण संवर्धन योजना अशा उपक्रमांमुळे पशुधन, पर्यावरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था या तिन्हींचे रक्षण होऊ शकते. बागायती क्षेत्र वाढणे ही प्रगतीची निशाणी असली तरी त्याचबरोबर पशुधन आणि पर्यावरणाचा विचार करणेही तितकेच महत्वाचे आहे. कुरणे आणि बागायती यांच्यातील समतोल बिघडल्यास दुग्ध व्यवसाय, दूध उत्पादन, जनावरांचे आरोग्य आणि ग्रामीण जीवनमान सर्वांवरच त्याचा परिणाम होतो.